इराणच्या कमांडरकडून अमेरिकी युद्धनौका नष्ट करण्याची धमकी

अमेरिकी युद्धनौकातेहरान – ‘याआधी अमेरिकी युद्धनौकेची पर्शियन आखातातील तैनाती इराणसाठी धोका मानला जात होता. पण आत्ता परिस्थिती बदलली आहे. कारण अमेरिकेची युद्धनौका नष्ट करणारी क्षेपणास्त्रे आणि सज्जता इराणकडे आहे’, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ कमांडर जनरल रहिम नुई अघदाम यांनी दिली.

इराणच्याच आघाडीच्या वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पर्शियन आखातासाठी ‘युएसएस निमित्झ’ ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका तैनात केली आहे. इराणच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, निमित्झची तैनाती केल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जाहीर केले होते. या विमानवाहू युद्धनौकेच्या तैनातीचा दाखला देऊन जनरल अघदाम यांनी अमेरिकेला धमकावले.

अमेरिकी युद्धनौका‘अमेरिकेच्या विनाशिका म्हणजे अमेरिकेचे देशाबाहेरचे लष्करी तळ म्हणून ओळखले जातात. यामध्ये लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विमानवाहू युद्धनौकांचा समावेश आहे. अशा या विमानवाहू युद्धनौकांची इराणच्या सागरी क्षेत्राजवळील तैनाती आपल्या देशासाठी धोका समजली जात होती. मात्र आता अमेरिकेच्या या युद्धनौकांना जलसमाधी देण्यासाठी इराणने वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे’, असे जनरल अघदाम म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच इराणने पर्शियन आखातात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले होते. सदर क्षेपणास्त्रे निमित्झपासून १०० मैल अंतरावर कोसळले होते. तर काही महिन्यांपूर्वी इराणने होर्मुझच्या आखातात अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती उभारून त्यावर क्षेपणास्त्राचे हल्ले चढविण्याचा सराव केला होता.

leave a reply