डॅनिअल पर्ल यांच्या मारेकर्‍यांना मुक्त करणार्‍या पाकिस्तानला अमेरिकेचा खरमरीत इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्ल यांचे अपहरण व निघृण हत्या घडविणारा दहशतवादी अहमेद ओमर सईद शेख व त्याच्या साथीदाराची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. यावर अमेरिकेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्थनी ब्लिंकन यांनी यावर पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला आहे. पर्ल यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा देण्यासाठी पाकिस्तानने प्रयत्न करावे, अन्यथा त्यांच्यावर न्यायालयीन कारवाईसाठी अमेरिकेच्या हवाली करावे अशी मागणी परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केली आहे. परराष्ट्रमंत्रीपदावर नियुक्त झाल्यानंतर ब्लिंकन यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानबाबत दिलेली ही प्रतिक्रिया घातक बाब ठरते, अशी चिंता पाकिस्तानचे पत्रकार व्यक्त करीत आहेत.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी असलेल्या संबंधांवर प्रकाशझोत टाकणार्‍या बातमीवर डॅनिअल पर्ल काम करीत होते. त्यासाठी ते २००२ साली पाकिस्तानात आले होते. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या पाकिस्तानी वंशाच्या अहमेद ओमर सईद शेख व त्याच्या साथीदारांनी डॅनिअल पर्ल यांचे अपहरण केले. काही काळाने त्यांची निघृण हत्या घडविण्यात आली. या प्रकरणी शेख याला पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र २०२० सालच्या एप्रिल महिन्यात पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने शेख याची फाशी रद्द करून त्याला सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा केली. यावर अमेरिकेने तीव्र आक्षेप नोंदविला होता.

पाकिस्तानने शेख व त्याच्या साथीदारांच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊन अमेरिकेला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानेच शेख याची सुटका करण्याचा निर्णय?घेतला आहे. यावर अमेरिकेने जहाल प्रतिक्रिया उमटली. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी ही प्रक्षुब्ध करणारी बाब असल्याचे सांगून यासाठी पाकिस्तानवर जळजळीत शब्दात टीका केली. या निर्णयामुळे इतर पत्रकारांचाही जीव धोक्यात आला आहे, याची गंभीर नोंद अमेरिकेने घेतलेली आहे, असे सूचक उद्गार साकी यांनी काढले. पर्ल यांचा मारेकरी असलेल्या शेख व त्याच्या साथीदारांवर अमेरिकेत खटला चालविण्यासाठी पाकिस्तानने सहाय्य करावे, अशी मागणी साकी यांनी केली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनीही पाकिस्तानने शेख व त्याच्या साथीदारांवर अमेरिकेत खटला चालविण्यासाठी सहाय्य करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमेरिकेबरोबरील पाकिस्तानच्या संबंधांवर विपरीत परिणाम करणारा असल्याची चिंता पाकिस्तानचे पत्रकार व्यक्त करीत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ब्लिंकन यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानबद्दल विधान केले व ते अत्यंत नकारात्मक आहे, याकडे पाकिस्तानच्या पत्रकारांनी लक्ष वेधले. दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यास नकार देणार्‍या देशांना वेसण घालणार्‍या ‘एफएटीएफ’ची बैठक फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. सध्या ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानला या बैठकीत काळ्या यादीत टाकले जाईल, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. अशा परिस्थितीत डॅनिअल पर्ल यांच्या मारेकर्‍यांना मोकळे करणार्‍या पाकिस्तानला काळ्या यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग यामुळे अधिकच प्रशस्त बनला आहे. या निकालामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आल्याची ठपका भारताने ठेवला आहे.

leave a reply