इराणने अमेरिकेला दिलेल्या संधीची खिडकी बंद होत आहे

- संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत

वॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकेने इराणवरील निर्बंध बिनशर्त मागे घ्यावे, यासाठी इराणने अमेरिकेला एक संधी दिली होती. बायडेन प्रशासनासाठी ही संधीची खिडकी फार काळ खुली राहणार नसल्याचा संदेशही इराणने दिला होता. पण आता अमेरिकेला दिलेल्या ह्या संधीची खिडकी बंद होत चालली आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत माजिद तख्त-रवांची यांनी दिला. त्याचबरोबर अणुकराराच्या नियमांबाबत इराणला आठवण करून देणार्‍या अमेरिकेने आधी आपण हे नियम तपासून पहावे, असे इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी सुनावले आहे.

आठवड्याभरापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच इराणचे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी आपल्या देशावरील सर्वच्या सर्व निर्बंध बिनशर्त मागे घ्यावे, अशी मागणी केली होती. सदर निर्बंध मागे घेण्याबरोबर अमेरिकेने इराणकडून नव्या अपेक्षा ठेवू नये, असे झरिफ यांनी अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले होते. अमेरिकेसमोर आपल्या मागण्या ठेवताना परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी बायडेन प्रशासनासाठी ही एक संधी असून या संधीची खिडकी फार काळ खुली राहणार नसल्याची जाणीव करून दिली होती.

झरिफ यांनी दिलेल्या या इशार्‍याला आठवडा लोटला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे राजदूत माजिद तख्त-रवांची यांनी अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेला पुन्हा एकदा आपल्या मागणीची आठवण करून दिली. ‘अमेरिकेने आपल्या वचनांचे पालन करून इराणवरील सर्व बेकायदेशीर निर्बंध काढले तरच इराण 2015 सालच्या अणुकरारातील अटींसाठी तयार होईल. याबाबत अमेरिकेला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. कारण इराणने दिलेल्या या संधीची खिडकी बंद होऊ लागली आहे’, असे रवांची यांनी म्हणाले.

त्याचबरोबर अमेरिकेने सर्वप्रथम इराणविषयक भूमिकेत बदल करावा, अशी मागणी इराणच्या राजदूतांनी केली. यासाठी अमेरिकेकडे मर्यादित काळ असल्याचे रवांची म्हणाले. या मुदतीनंतर इराणच्या अणुप्रकल्पांचे निरिक्षण करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना रोखले जाईल, असे रवांची यांनी सांगितले. याआधी इराणच्या नेत्यांनी केलेल्या घोषणेनुसार, इराणवरील निर्बंध मागे घेऊन अणुकरार करण्यासाठी अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांकडे 21 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकेवर हल्ला चढविला. इराणने 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन केले नसून अमेरिकेने या कराराच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप झरिफ यांनी केला. इराण या अणुकरारात सहभागी व्हावा, असे वाटत असेल तर अमेरिकेने इराणच्या मागण्या मान्य कराव्या, असे झरिफ म्हणाले. इराणने मर्यादेपेक्षा अधिक युरेनियमचे संवर्धन सुरू केले आहे. तेव्हा इराणने अणुकराराच्या मर्यादांचे पालन केले तरच अमेरिका चर्चेसाठी तयार होईल, अशी भूमिका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी काही तासांपूर्वी घेतली होती. त्यावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

दरम्यान, इराणने महिन्याभराहून कमी कालावधीत 17 किलो युरेनियमचे संवर्धन पूर्ण केल्याची माहिती इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर कालिबाफ यांनी केली. तर पुढच्या तीन महिन्यांच्या कालावधीत इराण नातांझ अणुप्रकल्पात हजार सेंट्रिफ्युजेस बसविल, अशी माहिती इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी यांनी दिली.

leave a reply