अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर अमेरिकेला पश्‍चाताप करावा लागेल

- ‘सीआयए’चे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रॉस

वॉशिंग्टन – ‘अफगाणिस्तानातून घाईघाईने सैन्यमाघारी घेण्याच्या निर्णयासाठी अमेरिकेला लवकरच पश्‍चाताप करावा लागेल. यासाठी फार काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही’, असा इशारा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रॉस यांनी दिला. अमेरिकन सुरक्षा यंत्रणेतील माजी अधिकारी व जवानांनी देखील या सैन्यमाघारीवर टीका केली आहे. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि माजी परराष्ट्रमंत्री काँडोलिझा राईस व हिलरी क्लिंटन यांनी देखील सैन्यमाघारीवरून बायडेन प्रशासनाला इशारे दिले होते.

अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर अमेरिकेला पश्‍चाताप करावा लागेल - ‘सीआयए’चे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रॉसअफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार 95 टक्के पूर्ण झाली आहे व वेगवान सैन्यमाघारीमुळे अमेरिकन जवानांची सुरक्षा निश्‍चित झाल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दोन आठवड्यांपूर्वी केला होता. यावर अमेरिकेतूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘सीआयए’चे माजी प्रमुख व निवृत्त लष्करी अधिकारी जनरल पेट्रॉस यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ही सैन्यमाघार घाईघाई व निष्काळजीपणे घेतल्याची टीका केली.

‘अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्यमाघार ही गंभीर चूक ठरते. प्रत्येक आठवड्याबरोबर तिथली परिस्थिती अधिकाधिक भयानक बनत चालली आहे. लवकरच या सैन्यमाघारीसाठी आपल्याला पश्‍चाताप करावा लागेल’, असा इशारा पेट्रॉस यांनी दिला. अफगाणी लष्कर तालिबानविरोधात संघर्ष करीत आहेत. पण या संघर्षात अफगाणी जवानांचा मोठ्या प्रमाणात बळी जात आहे, याकडे सीआयएच्या माजी प्रमुखांनी लक्ष वेधले.अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर अमेरिकेला पश्‍चाताप करावा लागेल - ‘सीआयए’चे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रॉस

‘या सैन्यमाघारीबरोबर इथला अमेरिकेचा सहभाग संपुष्टात येईल, पण अफगाणिस्तानातील युद्ध संपणार नाही. कारण या सैन्यमाघारीमुळे अफगाणिस्तान आता भीषण गृहयुद्धाच्या कड्यावर उभा आहे’, असे पेट्रॉस यांनी बजावले. पेट्रॉस यांच्याप्रमाणे पेंटॅगॉनचे माजी अधिकारी जेह जॉन्सन यांनी देखील सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा दावा केला.

अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर अमेरिकेला पश्‍चाताप करावा लागेल - ‘सीआयए’चे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रॉसगेल्या आठवड्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी बायडेन प्रशासनाच्या निर्णयावर ताशेरे ओढले होते. ‘या सैन्यमाघारीनंतर तालिबान अफगाणी जनतेची कत्तल करील. अफगाणी महिला व मुलींना शब्दात वर्णन करता येणार नाही, अशा भीषण यातना सहन कराव्या लागतील’, याची जाणीव बुश यांनी करून दिली होती. तर माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस आणि हिलरी क्लिंटन यांनी देखील या सैन्यमाघारीचे विपरित परिणाम समोर येतील, असे बजावले होते.

दरम्यान, तालिबान अफगाणिस्तानात लष्करी आघाडी घेत असताना, रशियाने उझबेकिस्तानच्या सीमेवर लष्करी सरावाचे आयोजन केले. यासाठी रशियाने आपले रणगाडे उझबेक सीमेवर दाखल केले आहेत. काही दिवसांपूर्वी रशियानेही अमेरिकेच्या या वेगवान सैन्यमाघारीवर टीका केली होती. यामुळे अफगाणिस्तानात अस्थैर्य माजेल व त्याचा परिणाम मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेवर होईल, असे रशियाने बजावले होते. वेळ पडलीच तर रशिया अफगाणिस्तानात सैन्य रवाना करील, असे संकेत रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले होते.

leave a reply