कोरोनाचा फैलाव चीनमधूनच झाल्याचे अमेरिका जगाला पटवून देईल

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – ‘लाखो जणांचा बळी घेणाऱ्या आणि जागतिक अर्थव्यवस्था ठप्प करणाऱ्या कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाला. डिसेंबर महिन्यातच चीनकडे या साथीची माहिती होती. पण चीनने ही माहिती दडवून ठेवली. अमेरिका चीनचा हा खोटारडेपणा साऱ्या जगासमोर उघड केल्याशिवाय राहणार नाही’, अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. याद्वारे अमेरिकेने चीनच्या विरोधात राजनैतिक पातळीवरील युद्धाचे रणशिंगच फुंकल्याचे दिसत आहे.

कोरोनाव्हायरसमुळे झालेली भयंकर जीवितहानी आणि अफाट आर्थिक नुकसानासाठी चीनला जबाबदार धरलेच पाहिजे, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या साथीमुळे जबर आर्थिकहानी झालेल्या देशांची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी या आर्थिक संकटाला चीन जबाबदार आहे, हे पटवून देण्यासाठी अमेरिकेचे राजनैतिक स्तरावर व्यापक प्रयत्न सुरू असल्याची माहिती पॉम्पिओ यांनी दिली.

‘गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच चीनला या विषाणूची पूर्ण माहिती होती. तरीही चीनने ही माहिती आपल्या जनतेपासून व आंतरराष्ट्रीय समुदायापासून लपवून ठेवली तसेच आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले. या साथीचे सत्य जगापासून दडविण्यासाठी चीनने जे काही केले, त्याचा लांबलचक पाढा वाचता येऊ शकतो आणि अमेरिका नेमके हेच करणार आहे’, असे सांगून माईक पॉम्पिओ यांनी चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्याचे संकेत दिले.

चीन जर पारदर्शकता आणि मानवाधिकारांच्या मुलभूत नियमांचे पालन करणार नसेल तर यापुढे अमेरिका चीनबरोबर व्यापारी संबंध ठेवणार नाही, असा इशारा पॉम्पिओ यांनी दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी देखील कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचे ठासून सांगितले. वुहानमधील दोनपैकी एका प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर पडल्याचे ओब्रायन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्याबरोबर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, तैवान या देशांनी देखील कोरोनाव्हायरस प्रकरणी चीनवरील दडपण वाढविण्यास सुरुवात केली आहे.

leave a reply