चीन आणि जगामध्ये रुंदावत असलेली दरी म्हणजे भारतासाठी सुसंधी

- केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरस संकटामुळे चीनची नकारात्मक प्रतिमा तयार झाली असून जग ज्याप्रमाणे चीनपासून दूर चालले आहे, ते पाहता भारतासाठी सुसंधी निर्माण झाली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करण्याची हीच उचित वेळ आहे. अशा काळात पाश्चिमात्य देश भारताला चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास आपल्याला असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या हजार बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आपले कारखाने स्थापन करण्यात उत्सुक असल्याची आणि सरकारबरोबर विविध पातळ्यांवर चर्चा करीत असल्याची माहिती उघड झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री गडकरी यांचे हे विधान महत्वाचे ठरते.

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर खूपच घसरेल अशी, शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत फार चिंता करण्याची गरज नसून देशाची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. ”जस जसे जग चीनपासून दूर जात आहे, ही बाब भारतासाठी अप्रत्यक्षरित्या कृपाशिर्वाद ठरत आहे. या संकटाचे आम्ही संधीत रूपांतर करू. परकीय कंपन्यांबरोबर नवे प्रकल्प सुरु करण्याची हीच योग्य वेळ आहे.”, असे गडकरी म्हणाले.

”जपानने आपल्या देशाच्या कंपन्यांना चीनमधून आपले उदयॊग हलविण्यासाठीदोन अब्ज डॉलर्सचे पॅकेज दिले आहे. चीनविरोधातील या नकारत्मक भावनेचा लाभ भारताला होईल, याबाबत मी आशावादी आहे. जपानबरोबर आपल्या देशाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि सरकार परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काम करीत आहे”, असे गडकरी यांनी अधोरेखित केले. तसेच भारताला पाश्चिमात्य देश चांगला प्रतिसाद देतील. विशेषतः अमेरिका, ब्रिटन, इटली आणि फ्रान्सकडून अपेक्षा असे गडकरी म्हणाले. याशिवाय कुशल कामगार आणि जमिनीच्या कमी दरामुळे भारत गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण ठरते, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.

दरम्यान सध्या भारतीय अर्धव्यवस्थेसमोरील सर्वात मोठी समस्या रोखतेची कमतरता आहे. त्यामुळे महामार्ग आणि रस्ते बांधणीच्या कामांचे लक्ष्य यावर्षी दुप्पट करण्यात आले असून. कंत्राटदारांना त्यांचे पैसे त्वरीत देण्याचे आदेश देण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेत रोखता वाढण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. याआधी शुक्रवारी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सरकारी उपक्रमांकडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची (एमएसएमई) थकबाकी लवकरच देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. कोरोनाव्हायरसमुळे ‘ एमएसएमई’वर परिणाम झाला आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रात दिलासा मिळेल आणि बाजारात रोखता वाढू शकेल, असे गडकरी यांनी म्हटले होते.

leave a reply