उत्तराखंडची सीमा नेपाळ व तिबेटला जोडलेली

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा चीनला संदेश

देहरादून – चीन आपल्या भारतविरोधी कारवायांची तीव्रता वाढवित असताना, भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनला खणखणीत इशारा दिला आहे. भारताच्या उत्तराखंडची सीमा नेपाळ व तिबेटला भिडलेली आहे, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनला खरमरीत संदेश दिला. ज्याचा सध्या भारत व चीनची सीमा किंवा एलएसी असा उल्लेख केला जातो, ती प्रत्यक्षात भारत व तिबेटची सीमा आहे. चीनने तिबेटचा अवैधरित्या ताबा घेतल्यानंतर, ही भारत-चीन सीमा बनली. भारतातील तिबेटी संघटना वारंवार याची आठवण करून देतात. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी याचा अप्रत्यक्ष उल्लेख करून भारत तिबेटबाबतचे आपले धोरण बदलू शकतो, याची जाणीव चीनला करून दिली आहे.

उत्तराखंडची सीमा नेपाळ व तिबेटला जोडलेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा चीनला संदेशदेहरादून येथील ‘सैन्य धाम’ विकसित करण्यात येत असून याच्या भूमीपुजन सोहळ्याच्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री बोलत होते. यावेळी शेजारी देशांबद्दल बोलताना राजनाथ सिंग यांनी नेपाळचा विशेषत्त्वाने उल्लेख केला. ‘काही शक्ती भारत व नेपाळचे संबंध बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण कुठल्याही परिस्थितीत तसे होऊ दिले जाणार नाही’, असे सांगून संक्षणमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या चीनला लक्ष्य केले. गेल्या काही वर्षांपासून चीन नेपाळवरील आपला प्रभाव वाढवून या देशात भारतविरोधी सरकार सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच नेपाळच्या काही नेत्यांचा वापर करून चीनने भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण हा डाव आता चीनवर उलटला असून सध्याचे नेपाळचे सरकार भारताशी उत्तम सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारत व नेपाळमध्ये वैर निर्माण करणार्‍या शक्तींना यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे बजावले आहे. त्याचवेळी भारताच्या उत्तराखंडची सीमा नेपाळ व तिबेटला जोडलेली असल्याचे सांगून तिबेटशी भारतीयांचे भावनिक नाते असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.

तिबेटबाबत बोलताना राजनाथ सिंग यांनी चीनचा उल्लेख केला नाही. आत्तापर्यंत भारताने तिबेट हा चीनचा भाग असल्याचे अधिकृत पातळीवर मान् केले होते. पण सध्या चीन भारतविरोधी कारवाया तीव्र करीत असताना, भारत आपल्या या धोरणावर फेरविचार करू शकतो, असा संदेश याद्वारे संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. त्याचवेळी चीनच्या आक्रमकतेची भारत पर्वा करणार नाही, असे संकेत देखील संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिले. ‘सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांचे हात भारताने बांधून ठेवलेले नाहीत. सीमेवर काही काळापूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतीय सैन्याने मोठ्या धैर्य व शौर्याने सामना केला. यासाठी लष्करप्रमुखांना मी संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. एखादी विपरित गोष्ट घडली तरी सरकार आपल्या सैन्यदलांसोबत असेल, असा विश्‍वास त्यांना देण्यात आलेला आहे’, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी देश कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला.

‘संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यावेळी आपल्यामध्ये नाहीत. पण प्रत्येकाच्या हृदयात त्यांच्या स्मृती कायम राहतील. या सैन्य धामच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव जनरल बिपीन रावत असे असेल’, अशी घोषणा यावेळी राजनाथ सिंग यांनी केली. दरम्यान, भारत चीनला थेट इशारे देत असताना चीनच्या तिबेटमधील लष्करी कारवाया प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसू लागले आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने तिबेटमध्ये आण्विक, रासायनिक व जैविक युद्धाचा सराव केल्याच्या बातम्या आल्या आहेत. याचा पुष्टी शकलेली नाही. मात्र चीन भारतावरील दडपण वाढविण्यासाठी युद्धसरावांचे आयोजन याआधीही केले होते. मात्र भारताने त्याची पर्वा न करता चीनला सडतोड प्रत्युत्तर देणार्‍या हालचाली सुरू ठेवल्या होत्या.

leave a reply