भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘वरुणास्त्र’ दाखल

नवी दिल्ली – शनिवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीचे टॉर्पेडो ‘वरुणास्त्र’ दाखल करण्यात आले. याची मारक क्षमता 40 किलोमीटर इतकी असून प्रति तास 70 किलोमीटर वेगाने हल्ला करण्याची क्षमता ‘वरुणास्त्र’मध्ये आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) विशाखापट्टणम येथील ‘नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी’ने (एनएसटीएल) हा टॉर्पेडेो विकसित केले आहे. तर ‘भारत डायनॉमिक्स लिमिटेड’ने (बीडीएल) याचे उत्पादन सुरू केले आहे. वरुणास्त्र पाणबुडीभेदी टॉर्पेडो असून यात 250 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच खोल आणि उथळ पाण्यातील पाणबुड्यांनाही या टॉर्पेडेोद्वारे लक्ष्य करता येईल. यात जोडलेल्या ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे लक्ष्याचा अचूकपणे वेध घेणे या टॉर्पेडेोला सहज शक्य आहे.

शनिवारी ‘डीआरडीओ’चे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या उपस्थितीत पहिले वरुणास्त्र नौदलाकडे सोपविण्यात आले. विशाखापट्टणममध्ये याचा सोहळा पार पडला. भारतीय नौदलाने 63 वरुणास्त्रांची मागणी नोंदविली आहे. यासाठी नौदल आणि बीडीएलमध्ये 1,187 कोटी रुपयांचा करार झाला आहे.

भविष्यात भारत मित्रदेशांना वरुणास्त्र पुरविणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने आपल्या नौदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यामध्ये पाणबुडीभेदी विनाशिका व पाणबुड्यांच्या निर्मितीबरोबर पाणबुड्यांना लक्ष्य करणारे टॉर्पेडो विकसित करण्यावरही भर देण्यात आला होता. चीनच्या नौदलात मोठ्या संख्येने पाणबुड्या असून भारताच्या सागरी क्षेत्रानजिक चिनी पाणबुड्यांचा वावर भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारा ठरतो.

या पार्श्‍वभूमीवर, पाणबुड्यांना लक्ष्य करू शकणाऱ्या ‘वरुणास्त्र’ची निर्मिती आणि मित्रदेशांना हा टॉर्पेडो पुरविण्याचा निर्णय भारताच्या सामरिक धोरणाचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply