लडाखपासून सिक्कीमपर्यंतच्या सीमेवर चीनकडून आधुनिक रडारयंत्रणेची तैनाती

नवी दिल्ली – लडाखपासून सिक्कीमपर्यंतच्या भारतालगतच्या सीमेवर चीनने अत्याधुनिक रडारयंत्रणा बसविण्याची तयारी केली आहे. यामुळे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांबरोबरील चर्चेत चीन लडाखमधून माघार घेण्याची तयारी दाखवित असला, तरी या देशावर विश्‍वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भारतीय लष्करानेही लडाखच्या सीमेवर दिर्घकाळ वास्तव्याची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत. चिनी लष्कराचा आकस्मिक मारा आणि कडाक्याची थंडी, यापासून संरक्षण करण्यासाठी लष्कराने लडाखच्या एलएसीवर व्यवस्था उभारण्याची सुरूवात केली आहे.

लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला सीमावाद सोडविण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या पार पडल्या. यापैकी आठव्या फेरीतील चर्चेत चीनने एलएसीवरून लष्कर मागे घेण्याची तयारी दाखविली होती व ही माघार तीन टप्प्यात असेल, असे भारतीय माध्यमांनी जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात चीन या ठिकाणाहून माघार घेण्याच्या विचारात नाही, असे या देशाने सुरू केलेल्या लष्करी हालचालींवरून समोर येत आहे. लडाखपासून सिक्कीपर्यंतच्या एलएसीवर चीनने अत्याधुनिक रडारयंत्रणा बसविण्याची तयारी केली आहे.

लडाखच्या पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील मोक्याच्या टेकड्यांवर भारतीय लष्कराने ताबा मिळवून चीनला धक्का दिला होता. पुढच्या काळात भारतीय लष्कराकडून आपल्याला असा धक्का बसू नये, यासाठी चीनने ही तयारी केल्याचे दिसत आहे. भारतीय लष्करही चीनचे डावपेच उधळण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या एलएसीवर चीन नवा हल्ला चढवून गलवान व्हॅलीतील अपमानाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच चिनी लष्कराच्या आकस्मिक हल्ल्यापासून तसेच कडाक्याच्या थंडीपासून संरक्षणासाठी भारतीय लष्कर 6 ते 8 फुटांचा व्यास असलेल्या काँक्रिट पाईप्सची उभारणी करीत आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या टनेल्समध्ये हे पाईप्स टाकण्यात येत आहेत.

सैनिकांना हिमवृष्टी आणि हिमवादाळांपासून संरक्षण देण्यासाठी हे टनेल्स अत्यंत महत्त्वाचे ठरतील. दरम्यान, भारत आपल्या दडपणाला बळी पडून एलएसीवरून सैन्य माघारी घेत नाही, हे पाहून चीनने प्रचारयुद्ध तीव्र केले आहे. आपल्या लष्कराने वापरलेल्या मायक्रोव्हेव वेपनमुळे भारतीय सैनिकांना पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील टेकड्यांचा ताबा सोडावा लागला, असा प्रचार चीनकडून करण्यात आला होता. पण यात तथ्य नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. मात्र चीनच्या या दाव्यांमुळे हा देश सीमावादात आपली सरशी होत असल्याचे चित्र उभे करण्यासाठी उतावीळ झाल्याचे संकेत मिळत आहेत. चीनच्या सरकारी मुखपत्राने काही आठवड्यांपूर्वी भारतीय सैनिकांना कडक हिवाळ्यात तग धरून राहणे शक्य नसल्याचे दावे ठोकले होते. पण प्रत्यक्षात चिनी लष्कराच्या जवानांना लडाखच्या एलएसीचा हिवाळा झेपेनासा झाला आहे. दरदिवशी स्ट्रेचर्स तसेच हेलिकॉप्टर्सद्वारे आजारी पडलेल्या चिनी जवानांची वाहतूक हेच दाखवून देत असल्याचे माध्यमांचे म्हणणेआहे. इतकेच नाही, तर चिनी जवानांना पुरविण्यात आलेले गरम कपडे देखील निकृष्ट दर्जाचे असल्याने या जवानांची अवस्था अधिकच बिकट बनल्याचे तैवानी वृत्तपत्राने म्हटले आहे.

चिनी जवानांना गरम कपडे पुरविण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर सोपविण्यात आली होती. पण हे कपडे नऊ हजार फुटांवरील हवामानासाठी चालू शकतील, पण लडाखच्या 12 हजार फुटांवरील हवामानात या कपड्यांचा उपयोग होणार नाही, असे तैवान टाईम्सने म्हटले आहे. याचा फटका चिनी जवानांना बसत आहे. त्यामुळे लडाखच्या क्षेत्रात चीनने केलेली घुसखोरी या देशावरच उलटल्याचा दावा तैवान टाईम्सने केला आहे.

leave a reply