‘समिट ऑफ अमेरिकाज्‌‍’च्या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलासह मध्य अमेरिकेतील हजारो निर्वासितांचा तांडा अमेरिकेच्या दिशेने

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लॅटिन व मध्य अमेरिकेतील देशांची परिषद आयोजित केली असतानाच या देशांमधील हजारो निर्वासितांचा तांडा अमेरिकेच्या दिशेने निघाल्याचे उघड झाले. सोमवारी ग्वाटेमाला व मेक्सिकोच्या सीमेवरून पुढे निघालेल्या या तांड्यात जवळपास 10 हजारांहून अधिक निर्वासित असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत अमेरिकेसाठी निघालेल्या निर्वासितांच्या तांड्यातील हा सर्वात मोठा तांडा असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निर्वासितांबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी या निर्वासितांनी केली.

अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने लॉस एंजेलिस शहरात ‘समिट ऑफ अमेरिकाज्‌‍’ परिषदेचे आयोजन केले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या परिषदेत अमेरिकेसह 31 देश सहभागी झाले आहेत. या परिषदेत निर्वासितांचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचे सांगण्यात येते. बायडेन प्रशासनाने या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी नवी योजनाही तयार केली असून त्यात लॅटिन व मध्य अमेरिकेतील देशांनाही सहभागी करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी मध्य व लॅटिन अमेरिकेतील देश निर्वासितांबाबत अमेरिकेकडून वारंवार बदलण्यात येणाऱ्या भूमिकेवर आक्षेप नोंदविणार असल्याचे दावेही करण्यात येतात.

या पार्श्वभूमीवर मेक्सिको-ग्वाटेमाला सीमेवरून निघालेला हजारो निर्वासितांचा तांडा बायडेन प्रशासनाच्या अडचणी अधिक वाढविणारा ठरु शकतो. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाही घेतल्यानंतर निघालेला हा निर्वासितांचा सर्वात मोठा तांडा असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. सध्या या तांड्यात 10 हजारांहून अधिक निर्वासित असून अमेरिकेच्या सीमेवर पोहोचेपर्यंत ही संख्या 15 हजारांपर्यंत जाऊ शकते, असे सांगण्यात येते. बायडेन यांच्या कारकिर्दीत अमेरिकी सीमेच्या दिशेने येणारे तांडे ग्वाटेमाला व मेक्सिकोतच रोखण्यात आले होते.

मात्र सध्या मेक्सिको सरकार बायडेन प्रशासनावर नाराज असल्याने मेक्सिकन यंत्रणा तांडा रोखतील का, यावर शंका उपस्थित झाल्या आहेत. निर्वासित अमेरिका-मेक्सिको सीमेवर दाखल झाले तर अमेरिकी यंत्रणांवर प्रचंड ताण येऊ शकतो. गेल्या सव्वा वर्षात अमेरिकेत लाखोंच्या संख्येने निर्वासित घुसले असून त्याचा ताण अमेरिकेच्या सीमा तसेच सुरक्षा यंत्रणांवर आला आहे. अमेरिकेच्या सीमेवरील राज्ये बायडेन यांच्या धोरणांविरोधात आधीच तक्रारीचा सूर लावत आहेत. अशा परिस्थितीत नवे निर्वासित दाखल होणे अमेरिकेतील राजकीय तणाव अधिक तीव्र करणारे ठरु शकते.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. मेक्सिकोतून येणारे निर्वासितांचे तांडे रोखण्यासाठी आणीबाणी घोषित करून लष्कर तैनात करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मेक्सिको व इतर देशांना सुरक्षायंत्रणा तैनात करून अमेरिकेत दाखल होऊ पाहणाऱ्या निर्वासितांना रोखणे भाग पडले होते. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती.

leave a reply