अमेरिकन राष्ट्राध्यक्षांऐवजी उपराष्ट्राध्यक्षा हॅरिस परदेशी नेत्यांशी चर्चा करीत आहेत

- माध्यमांच्या दाव्यांमुळे बायडेन यांच्या क्षमतेचा मुद्दा ऐरणीवर आला

उपराष्ट्राध्यक्षा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अशा रितीने परदेशी राष्ट्रप्रमुखांशी थेट चर्चा करण्याची उपराष्ट्राध्यक्षा हॅरिस यांची ही दुसरी वेळ आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याऐवजी कमला हॅरिस थेट इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधू लागल्याने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळासह सोशल मीडियात बायडेन यांच्या क्षमतेवर चर्चा सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी बायडेन यांच्यासारख्या वृद्ध व्यक्तींकडे राष्ट्राध्यक्षांसाठी लागणारी आवश्यक क्षमता आहे का, अशी शंका उपस्थित केली होती.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतर अवघ्या १५ दिवसात उपराष्ट्राध्यक्षा हॅरिस यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनाही फोन केला. या दोन्ही घटनांमध्ये हॅरिस यांनी कोरोनाची साथ, हवामानबदल, अर्थव्यवस्था यासारख्या अनेक मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या प्रमुखांनाही फोन केला होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याऐवजी उपराष्ट्राध्यक्षा हॅरिस यांचे विदेशी राष्ट्रप्रमुख व आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या प्रमुखांशी होणारे कॉल्स माध्यमांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत.

ज्यो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे सर्वात वृद्ध राजकीय नेते ठरले आहेत. त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदासाठी शारिरीक उर्जा व मानसिक क्षमता आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतरही सोशल मीडियावर, बायडेन यांची जागा हॅरिस घेतील अशा स्वरुपाच्या पोस्ट प्रसिद्ध झाल्या होत्या. २० जानेवारी रोजी बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर, सुरुवातीच्या काही दिवसात उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊसमध्ये सातत्याने असणारी उपस्थितीही लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

या पार्श्‍वभूमीवर, महत्त्वाच्या विदेशी राष्ट्रप्रमुखांना उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी केलेल्या फोन्समुळे पुन्हा एकदा बायडेन यांच्या क्षमतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना, व्हाईट हाऊसमध्ये राहणे आपल्यासाठी सोनेरी पिंजर्‍यात राहण्यासारखे ठरते, असे म्हटले आहे.

leave a reply