बायडेन प्रशासनाने इराणशी अणुकरार केलाच तर इस्रायलचे सहकार्य विसरावे

- अमेरिकेतील इस्रायली राजदूतांचा इशारा

इस्रायलचे सहकार्य

जेरूसलेम – अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली नाही. यामुळे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे काहीच बिघडलेले नाही. मात्र अमेरिकेने इराणबरोबर अणुकरार केलाच तर मग इस्रायल बायडेन प्रशासनाशी सहकार्य करणार नाही, असा इशारा अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्दान यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी देखील इराणशी सहकार्य करून इस्रायलची सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या बायडेन प्रशासनाला कडाडून विरोध केला जाईल, असे बजावले होते.

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर तिसर्‍याच दिवशी इस्रायलच्या पंतप्रधानांना फोन केला होता. पण बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन तीन आठवडे उलटले आहेत. तरी देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली नाही. यावरुन अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर सडकून टीका केली होती. तर इस्रायलची सुरक्षा धोक्यात टाकून बायडेन यांचे प्रशासन दहशतवादी इराणला अब्जावधी डॉलर्सचे सहाय्य पुरविणार का असा सवाल अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला होता.

इस्रायलचे सहकार्यगेल्या आठवड्यत संयुक्त राष्ट्रसंघातील इस्रायलचे माजी राजदूत डॅनी डेनॉन यांनी तर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चर्चा केलेल्या देशांची यादी सोशल मीडियावर टाकली होती. यामुळे अधिकच वाद निर्माण झाला होता. यावर व्हाईट हाऊस तसेच इस्रायलमधील अमेरिकेच्या राजदूतांनी खुलासा देत, लवकरच बायडेन पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याशी चर्चा करतील, असे म्हटले. यावर नेत्यान्याहू यांचे विश्‍वासू आणि अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत गिलाड यांनी खोचक भाषेत टिपणी केली आहे.

‘कोरोनाव्हायरसची महामारी आणि आर्थिक संकटासारख्या गंभीर समस्यांमुळे बायडेन यांना इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा करणे शक्य झाले नसेल. यामुळे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे काहीच बिघडलेले नाही’, असे गिलाड म्हणाले. पण बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार केलाच तर मात्र इस्रायल अमेरिकेशी सहकार्य करणार नाही, असे गिलाड यांनी बजावले.

अमेरिकेने इराणशी अणुकरार करून निर्बंध शिथिल केले तर आतापर्यंत जे काही प्राप्त केले आहे, ते सर्वस्वी गमावून बसावे लागेल, असा इशारा इस्रायलच्या राजदूतांनी दिला. याआधी ट्रम्प प्रशासनाने इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध कायम राखले तसेच अधिक निर्बंध लादले तरच इराण खर्‍याअर्थाने वाटाघाटींसाठी तयार होईल, असे गिलाड यांनी सुचविले.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील इराणबरोबर अणुकरार करण्याच्या तयारीत असलेल्या बायडेन प्रशासनाला ताकीद दिली होती. ‘अमेरिकेतील कुठल्याही पक्षाचे नेते इस्रायलच्या सुरक्षेबाबत बांधिल असतील, इस्रायल देखील त्यांच्या पाठिशी असेल. पण इराणच्या अणुकराराचे समर्थन करणारे आणि पर्यायाने इस्रायलची सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या नेत्यांना आणि राजकीय पक्षांना इस्रायलचा कडाडून विरोध असेल. मग ते सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाचे असले तरी, त्यांचा विरोध केला जाईल’, असा सज्जड इशारा नेत्यान्याहू यांनी दिला होता.

दरम्यान, अणुकरारात सहभागी होण्यासाठी इराणने अमेरिकेला येत्या रविवारपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत अमेरिकेने आपल्यावरील सर्व निर्बंध मागे घ्यावे आणि विनाअट अणुकरारात सहभागी व्हावे, अशी मागणी इराणने केली आहे.

leave a reply