बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या विजयानंतर वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकेल

इस्रायलला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

netanyahuजेरूसलेम/वॉशिंग्टन – इस्रायलच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर बेंजामिन नेत्यान्याहू पुन्हा एकदा इस्रायलचे पंतप्रधान बनणार हे निश्चित झाले आहे. यासाठी जगातील प्र्रमुख नेते नेत्यान्याहू यांचे अभिनंदन करीत असताना, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी मात्र इस्रायलचे मावळते पंतप्रधान येर लॅपिड यांना फोन करून आत्तापर्यंत केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले. त्याचबरोबर पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमधील हिंसाचार वाढेल, अशी चिंता अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. यामुळे नेत्यान्याहू यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा इस्रायलचे अमेरिकेबरोबरील संबंध ताणले जाणार असल्याचे दिसू लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिकूड पक्षाचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू आणि त्यांच्याशी आघाडी असलेल्या राजकीय पक्षांना बहुमत मिळाले. इस्रायली संसदेतील १२० पैकी ६४ जागांवर नेत्यान्याहू व आघाडी पक्षाने विजय नोंदविला. तर मावळते पंतप्रधान लॅपिड आणि माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या पक्षाला ५१ जागाच जिंकता आल्या. या विजयानंतर नेत्यान्याहू पाचव्यांदा इस्रायलच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

blinken lapidपण त्याआधीच गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने नेत्यान्याहू यांच्या विजयावर नाराजी व्यक्त केली. गुरुवारी रात्री गाझापट्टीतून इस्रायलच्या दिशेने रॉकेट्सचे हल्ले चढविण्यात आले. गाझाच्या सीमेवर तैनात इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणांनी यातील निम्मे रॉकेट्स भेदले तर काही रॉकेट्स इस्रायलच्या हद्दीत मोकळ्या जागेत कोसळले. यात जीवितहानी झाली नाही. पण इस्रायलच्या लष्कराने पुढच्या काही तासातच गाझातील हमासच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले. यात हमासचे भुयारी तळ उद्‌‍ध्वस्त केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला. त्यामुळे येत्या काळात गाझापट्टीतून इस्रायलवरील हल्ले वाढतील, असा इशाराच हमासने दिला आहे.

इस्रायलमधील निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मित्रदेश व नेत्यांकडून नेत्यान्याहू यांचे अभिनंदन करण्यात आले. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी आणि हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन आघाडीवर होते. ग्रीस, पोलंड, रोमानिया आणि ऑस्ट्रिया या युरोपिय देशांच्या नेत्यांनीही नेत्यान्याहू यांचे अभिनंदन केले. गेल्या आठ महिन्यांपासून रशियाबरोबर संघर्ष करणाऱ्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देखील सोशल मीडियातून इस्रायलच्या भावी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. तसेच नेत्यान्याहू यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

gaza israel strikeजगभरातील प्रमुख नेते नेत्यान्याहू यांचे अभिनंदन करीत असताना, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी मावळते पंतप्रधान येर लॅपिड यांना फोन करून आत्तापर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर येत्या काळात वेस्ट बँकमधील तणाव वाढेल, हिंसाचार भडकून यात इस्रायली आणि पॅलेस्टिनींचा बळी जाईल, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. वेस्ट बँकमधील हिंसाचार रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे ब्लिंकन म्हणाले आहेत.

दरम्यान, नेत्यान्याहू यांच्यासारखा आक्रमक नेता पुन्हा इस्रायलच्या पंतप्रधानपदावर येणे बायडेन यांच्या प्रशासनाला रूचलेले नाही. त्यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा इस्रायल इराणविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. म्हणूनच नेत्यान्याहू यांच्याशी चर्चा न करता अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मावळते पंतप्रधान लॅपिड यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यामुळे पुढच्या काळातही बायडेन प्रशासन नेत्यान्याहू यांच्या सरकारवर दडपण वाढविण्यासाठी पावले उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नेत्यान्याहू यांच्या सरकारमधील काही नेत्यांच्या निवडीवरही अमेरिकेतून प्रतिक्रिया येऊ शकते, असे अमेरिकेचेच माजी राजदूत सांगत आहेत.

leave a reply