रशियाची युक्रेनमधील मोहीम म्हणजे सैतानाच्या विरोधातील पवित्र युद्ध

रशाियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह

dmitry medvedevमॉस्को – रशियाची युक्रेनमधील मोहीम म्हणजे सैतानाच्या विरोधातील पवित्र युद्ध असून रशिया आपल्या सर्व शत्रूंना नरकाच्या आगीत ढकलू शकतो, असा दावा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी केला. रशियाच्या ‘डे ऑफ नॅशनल युनिटी’च्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात मेदवेदेव्ह यांनी, नरकाच्या सर्वोच्च सत्ताधीशाला रोखणे हे आपल्या पितृभूमीचे कर्तव्य असल्याचेही म्हटले आहे. यावेळी त्यांनी युक्रेनची संभावना ‘क्रेझी नाझी ड्रग ॲडिक्टस्‌‍’ अशी केली.

गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ रशिया व युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. युक्रेनमधील नाझीसमर्थक राजवटीला रोखण्यासाठी तसेच नाटोचा विस्तार थांबविण्यासाठी युक्रेनवर आक्रमण केल्याचे रशियाचे नेते वारंवार सांगत आहेत. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला देण्यात येणारे समर्थन आणि युक्रेन तसेच पाश्चिमात्य नेत्यांकडून रशियाविरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमधून त्याला दुजोरा मिळत असल्याकडेही रशियन नेत्यांनी लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर मेदवेदेव्ह यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा पवित्र युद्ध असा उल्लेख करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

Russian Security Council Secretary Patrushev and Belarusian State Security Council Secretary Volfovich meet in Minskटेलिग्राम ॲपवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात मेदवेदेव्ह यांनी युक्रेन व पाश्चिमात्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘रशियाचे युक्रेनमधील युद्ध म्हणजे सैतानाविरोधातील पवित्र युद्ध आहे. नरकाचा सत्ताधीश ज्याला सैतान, ल्युसिफर किवा इब्लिस अशा नावांनी ओळखण्यात येते, त्याला रोखणे हे पितृभूमीचे कर्तव्य आहे. गुंतागुंत वाढविणारे असत्य हे सैतानाच्या शस्त्रांपैकी एक ठरते. तर आपले शस्त्र सत्य हेच आहे. त्यामुळे आपला हेतू न्याय्य आहे आणि विजय आपलाच असेल’, असा विश्वास मेदेवेदेव्ह यांनी व्यक्त केला.

रशियाकडे विविध शस्त्रे उपलब्ध असून या शस्त्रांमध्ये सर्व शत्रूंना नरकाच्या आगीत ढकलण्याची क्षमता आहे, असा दावाही माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी केला. युक्रेन म्हणजे अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या मूर्खांचा गट असून त्यांना लाळ गळणारे पाश्चिमात्य समर्थन देत असल्याचेही मेदेवेदेव्ह म्हणाले.

दरम्यान, सध्या जगासमोर उभ्या राहिलेल्या संकटामागे पाश्चिमात्यांची जगावर वर्चस्व गाजविण्याची महत्त्वाकांक्षा हे एकमेव कारण असल्याचा ठपका रशियाच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनी ठेवला आहे. पाश्चिमात्य देश राष्ट्रीय हितसंबंधांसह इतर देशांमधील परंपरा तसेच बहुस्तंभीय जगाच्या उभारणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही पत्रुशेव्ह यावेळी म्हणाले.

leave a reply