लॉकडाऊनमुळे अडकलेल्या चीनी पर्यटकांची नेपाळमध्ये हिंसक निदर्शने

काठमांडू – नेपाळमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या चिनी पर्यटकांनी केलेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागले असून चार नेपाळी पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या ५० चीनी पर्यटकांनी पंतप्रधान कार्यालयाच्या परिसरात जमून चीनला जाण्याची मागणी केली. पण नेपाळ पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीनंतर चिनी निदर्शकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. नेपाळ पोलिसांनी या प्रकरणी ४५ चीनी पर्यटकांना ताब्यात घेतले आहे. या हिंसक प्रदर्शनानंतर नेपाळमधील चीनच्या दूतावासाने आपल्या पर्यटकांना नेपाळच्या कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

ही घटना ८ मेची असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला आहे. ‘आय वॉंट टू गो होम’ असे फलक घेऊन हे पर्यटक पंतप्रधान कार्यालयाच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न करीत होते. पण हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे नेपाळ पोलिसांनी या सर्वांना इथून जायला सांगितले. मात्र निदर्शने करीत असलेल्या चिनी पर्यटकांनी दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीमार करावा लागला. या सर्वांवर प्रतिबंध क्षेत्रात घुसून प्रदर्शन करणे आणि लॉकडाऊनच्या काळात हिंसा करणे या आरोपाखाली शिक्षा होऊ शकते, अशी माहिती नेपाळ पोलीस प्रवक्ते किरण बजराचार्य यांनी दिली आहे.

कोरोनाव्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी नेपाळमध्ये २२ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. हा लॉकडाऊन ३१मे पर्यंत राहील असे सांगितले जाते. यामुळे अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स या देशांनी नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली होती. मात्र चीनच्या सरकारने अडकलेल्या आपल्या ५० पर्यटकांना बाहेर काढण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. याशिवाय चिनी पर्यटकांचे पैसे संपले असून इथे राहणे त्यांना अवघड बनले आहे. त्यामुळे ह्या सर्व पर्यटकांनी नेपाळमधील चीनच्या दूतावासाशी संपर्क साधला होता. पण तिथून त्यांना मदत न मिळाल्यामुळे या सर्वांनी पंतप्रधान कार्यालयाच्या परिसरात प्रदर्शन केले अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान नेपाळच्या जनतेने चीनी पर्यटकांवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. कुठल्याही परदेशी पर्यटकांनी त्या देशांतल्या पोलिसांवर हल्ला करणे ही चिंताजनक बाब ठरते. त्यामुळे अशा पर्यटकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेपाळी जनतेकडून होत आहे.न नेपाळमधील चीनच्या दूतावासाने चीनी पर्यटकांनी नेपाळच्या कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

leave a reply