भारतीय संरक्षणदलप्रमुखांची अमेरिका भेट ऐतिहासिक ठरली

- अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

वॉशिंग्टन – भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनला दिलेली भेट ऐतिहासिक ठरली, असा दावा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केला. संरक्षणमंत्री ऑस्टि यांनी स्वतःहून सोशल मीडियावर आपली ही प्रतिक्रिया नोंदविली आहे. भारतीय संरक्षणदलप्रमुखांबरोबर दोन्ही देशांची संरक्षणविषयक भागीदारी व अंतराळ, सायबर क्षेत्र आणि उदयाला येत असलेल्या लष्करी तंत्रज्ञानावर सखोल चर्चा पार पडली, असे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले आहे.

भारतीय संरक्षणदलप्रमुखांची अमेरिका भेट ऐतिहासिक ठरली - अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिनसंरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत ३० सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले होते. या दौर्‍यात अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांची भेट घेऊन जनरल रावत यांनी चर्चा केली होती. तसेच अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशीही जनरल रावत यांची चर्चा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा नुकताच पार पडला होता. या दौर्‍यात पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. यात उभय देशांमधील धोरणात्मक व लष्करी सहकार्याचा मुद्दा अग्रस्थानी होती. त्यानंतर जनरल रावत यांनी अमेरिकेला भेट दिली, ही बाब भारतीय माध्यमे अधोरेखित करीत आहेत.

स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी दोन्ही देश बांधिल असल्याची बाब जनरल रावत यांच्याबरोबरील आपल्या चर्चेतून स्पष्ट झाली. तसेच दोन्ही देशांच्या संरक्षणदलांमध्ये संयुक्त मोहीम राबविण्यासाठी आवश्यक समन्वयावरही जनरल रावत यांच्याशी चर्चा झाल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी म्हटले आहे. तर पेंटॅगॉनचे प्रवक्ते किर्बी यांनी भारतीय संरक्षणदलांमध्ये एकीकरण व संयुक्त कारवाईसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अमेरिका सहकार्य करील, असे जाहीर केले. भारताचे संरक्षणदलप्रमुख व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये इतर देशांबरोबरील सुरक्षाविषयक सहकार्य व्यापक करण्यावरही चर्चा पार पडल्याचे किर्बी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली असून तालिबानने दहशतवादाचा मार्ग सोडून दिलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. तसेच तालिबानचे अजूनही अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध कायम असल्याचे चिंताजनक अहवाल समोर येत आहेत. यापासून सार्‍या जगाला धोका संभवतो व यामुळे अमेरिकाही असुरक्षित बनल्याची चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला चढविण्यासाठी अमेरिकेला अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमध्ये तळ उभारायचे आहेत. त्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकडे मागणी केली होती. तसेच भारताशीही याबाबत चर्चा सुरू असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले होते. पण भारताने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. संरक्षणदलप्रमुखांच्या या अमेरिका भेटीत यावर चर्चा होईल, असा तर्क काहीजणांनी व्यक्त केला होता. पण याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. त्याचवेळी भारतीय नेते व संरक्षणदलप्रमुखांच्या अमेरिका भेटीत पाकिस्तानला अद्दल घडविण्यावर एकमत झाल्याची चिंता पाकिस्तानच्या काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. लवकरच दोन्ही देश मिळून पाकिस्तानवर कारवाई करू शकतात, असा इशारा या पत्रकारांनी दिला आहे.

leave a reply