रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा भारताला ‘संदेश’

मॉस्को – २०२१ साली भारत आणि रशियाचे सर्वच पातळ्यावरील सहकार्य अधिकच दृढ होईल, असा विश्‍वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संदेश पाठवून ख्रिसमस तसेच नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारत आणि रशियामध्ये विशेष भागीदारी आहे व पुढच्या काळात क्षेत्रिय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर दोन्ही देश एकमेकांना अधिक सहकार्य करतील, असा विश्‍वास रशियन राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला आहे. भारत-रशियामधील धोरणात्मक चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे उभय देशांमधील संबंध बिघडल्याचे दावे ठोकून चीन व पाकिस्तानच्या माध्यमांनी यावर आनंद व्यक्त केला. पण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा संदेश भारताच्या दोन्ही शेजारी देशांच्या उत्साहावर पाणी फेरणारा ठरत असल्याचे दिसते.

काही आठवड्यांपूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी भारताच्या ‘क्वाड’मधील सहभागावर शेरेबाजी केली होती. अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाडमध्ये सहभागी होऊन भारताने चीनविरोधी आघाडीचा भाग बनू नये, असे लॅव्हरोव्ह म्हणाले होते. तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या सार्वभौमत्त्वावर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली टिपणी भारतीय मुत्सद्यांना अस्वस्थ करणारी ठरली. यावर रशियाच्या भारतातील राजदूतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे रशिया भारताच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका सुरू झाली होती.

लडाखच्या एलएसीवर आकस्मिक हल्ला चढवून चीनने भारताचे २० सैनिक शहीद केले होते. त्यानंतर भारतात चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरच्या काळातही चीनने लडाखच्या एलएसीवर मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करून भारताला चिथावणी दिली होती. यानंतर भारताने क्वाडमध्ये अधिक सक्रीय भूमिका स्वीकारण्याचे संकेत देऊन चीनला प्रत्युत्तर दिले होते. भारताच्या या निर्णयावर टीका करीत असताना, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे सुरक्षाविषयक हितसंबंध ध्यानात घेतलेले नाहीत, याची जाणीव भारताने नेमक्या शब्दात रशियाला करून दिली.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाबरोबरील मैत्रिपूर्ण संबंधांना भारत सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे स्पष्ट केले. मात्र आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ते निर्णय घेणे भारताला भाग असल्याचे सांगून जयशंकर यांनी रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या आक्षेपांना उत्तर दिले होते. यानंतरच्या काळात भारत व रशियामध्ये पार पडणारी धोरणात्मक चर्चा पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याचा संदर्भ देऊन चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने भारत व रशियाचे संबंध बिघडल्याचे दावे ठोकले होते. वरकरणी दोन्ही देश हे मान्य करीत नसले तरी दोन दशकांपासून सुरू असलेली चर्चा यावेळी पार पडलेली नाही, ही बाब बरेच काही सांगून जात असल्याचा निर्वाळा ग्लोबल टाईम्सने दिला होता. पाकिस्तानचे विश्‍लेषकही भारत व रशिया एकमेकांपासून दूर गेल्याचे सांगून पुढच्या काळात रशिया भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहाय्य करणार असल्याचे दावे करू लागले होते.

या पार्श्‍वभूमीवर, रशियन राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांना पाठविलेल्या संदेशाला फार मोठे महत्त्व आले असून यामुळे चीन व पाकिस्तानचा उत्साह मावळण्याची शक्यता आहे.

leave a reply