येमेनमध्ये आघाडी सरकारच्या विमानावर हल्ला

- २६ जणांचा बळी, तर ५० जखमी

एडन – येमेनच्या एडन येथील विमानतळावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. सौदी अरेबियातून दाखल झालेल्या येमेनच्या आघाडी सरकारच्या विमानाला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडविण्यात आला. येमेनमधील सौदीसमर्थक आघाडी सरकार मान्य नसलेली आणि इराणचे पूर्ण समर्थन असलेली ‘हौथी’ ही बंडखोर संघटना यासाठी जबाबदार असल्याचा आरोप येमेनच्या सरकारने केला आहे. तर या हल्ल्याबरोबर येमेनमधील हौथी बंडखोरविरोधी संघर्ष पुन्हा पेट घेण्याची शक्यता वाढली आहे. दहा दिवसांपूर्वी येमेनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले हादी सरकार आणि दक्षिण येमेनमधील बंडखोर गटांचे आघाडी सरकार स्थापन झाले. सौदी अरेबियाचे समर्थन असलेले राष्ट्राध्यक्ष हादी आणि या बंडखोर गटांच्या या सरकार स्थापनेचे जगभरातून स्वागत झाले होते. यामुळे या संघर्षग्रस्त येमेनमध्ये काही प्रमाणात शांतता प्रस्थापित होईल, असा दावा केला जात होता. सौदीने येमेनमधील या नव्या सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना विशेष दौर्‍यावर आमंत्रित केले होते.

सौदीच्या दौर्‍यानंतर येमेनच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचे विमान बुधवारी एडनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. सदर विमान धावपट्टीवर असतानाच विमानतळावर मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या ठिकाणी गर्दी जमू लागल्यानंतर आणखी एक स्फोट झाला. यामुळे या स्फोटातील बळींची संख्या वाढून २६ वर पोहोचली आहे. या स्फोटाबरोबर विमानतळावरील रिसेप्शन हॉलमध्ये देखील स्फोट झाल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त या स्फोटानंतर घटनास्थळावर गोळीबार झाल्याची माहिती दिली जात आहे. या हल्ल्यासाठी कत्युशा रॉकेट्सचा वापर झाल्याचे दावे केले जातात.

या हल्ल्यातून बचावलेल्या येमेनच्या आघाडी सरकारच्या नेत्यांना काही अंतरावरील ‘माशेक राष्ट्राध्यक्षीय निवासस्थाना’वर नेण्यात आले. निवासस्थानाच्या बाहेरही यावेळी स्फोट झाल्याचा दावा केला जातो. पण याबाबत कुठलाही खुलासा झालेला नाही. राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानात पंतप्रधान माईन अब्दुलमलिक यांच्यासह सर्व कॅबिनेटमधील नेते सुरक्षित असल्याची माहिती, येमेनचे माहितीसंचार मंत्री मुअम्मर अल-इरयानी यांनी दिली. तसेच या हल्ल्यासाठी इराणसमर्थक हौथी ही येमेनमधील बंडखोर संघटना जबाबदार असल्याचा आरोपही मुअम्मर यांनी केला. तर येमेनचे पंतप्रधान अब्दुलमलिक यांनी हा दहशतवादी हल्ला असून आपल्या देशाविरोधात छेडलेल्या युद्धाचा भाग असल्याचे सांगितले. पण येमेनच्या पंतप्रधानांनी हौथी बंडखोरांवर थेट आरोप करण्याचे टाळले.

येमेनमधील ‘हुसैन बद्रेद्दिन अल-हौथी’ या बंडखोर नेत्याने १९९२ साली या गटाची स्थापना केली होती. इराणचे समर्थन मिळालेल्या या गटाने याआधी येमेनमधील राजवटीविरोधात सशस्त्र उठावाचे प्रयत्न केले. अल-हौथी यांच्या समर्थकांना हौथी बंडखोर म्हटले जाते. २०१४ सालापासून येमेनमधील हौथी यांच्या गटाने हादी सरकारविरोधात जोरदार संघर्ष छेडला.

हौथींच्या हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष हादी यांनी सौदी अरेबियामध्ये आश्रय घेतला व सौदीतूनच ते येमेनचे सरकार चालवित आहेत. तर सौदीसह युएई, इजिप्त या अरब देशांनी हौथी बंडखोरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून सौदी व अरब देशांची आघाडी आणि हौथी बंडखोरांमधील या संघर्षात एक लाखाहून अधिक जणांचा बळी गेला असून लाखो जण बेघर झाले आहेत. या संघर्षामुळे येमेनमध्ये सर्वात भीषण संकट ओढावल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.

इराणकडून हौथी बंडखोरांना पूर्ण सहाय्य पुरविले जात असल्याचा आरोप अमेरिका व सौदी करीत आहेत. इराणी बनावटीची क्षेपणास्त्रे, ड्रोन्सचे सुटे भाग हौथींकडे सापडल्याचेही उघड झाले होते. याशिवाय इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा कमांडरही गेल्या दोन महिन्यांपासून येमेनमध्ये उघडपणे हौथी बंडखोरांच्या संपर्कात असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. इराणने नेहमीच येमेनमधील हौथी बंडखोरांना आपला पाठिंबा असून येथील हादी सरकार व सौदीच्या लष्करी कारवाईवर टीका केली आहे. मात्र आपण हौथी बंडखोरांना शस्त्रे पुरवित नसल्याचा दावा इराण करीत आहे.

leave a reply