दुसरे शीतयुद्ध छेडणे बेजबाबदारपणा ठरेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा

दुसरे शीतयुद्धवॉशिंग्टन – अमेरिका व युरोपिय देश त्यांची भूराजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडथळे उभारण्याचे धोरण राबवित असून हे धोरण उलटू शकते, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी बजावले. त्याचवेळी अमेरिका व पाश्चिमात्य देश चीनविरोधात घेत असलेल्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची विभागणी होईल, असा दावाही त्यांनी केला. याचा अमेरिका व मित्रदेश आणि चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख जॉर्जिव्हा यांनी दुसरे शीतयुद्ध असा केला असून हे शीतयुद्ध सुरू करणे बेजबाबदारपणा ठरतो, असा इशाराही दिला. दोन दिवसांपूर्वीच ब्रिटनचे माजी लष्करी अधिकारी रिचर्ड शिरेफ यांनी तिसरे महायुद्ध थांबवायचे असेल, तर पाश्चिमात्य देशांना दुसरे शीतयुद्ध लढावे लागेल, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दुसरे शीतयुद्धरशिया-युक्रेन संघर्षावरून अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाला आंतरराष्ट्रीय यंत्रणांमधून बाहेर काढण्याचे व जागतिक व्यवस्थेपासून तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला चीनवरही निर्बंध व दंडाची कारवाई करण्यात येत असून चिनी गुंतवणुकीबाबत सावधगिरीची भूमिका घेण्यात येत आहे. अमेरिका व युरोपातील अनेक देशांनी चिनी कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचे निर्णय घेतले आहेत. त्याचवेळी संवेदनशील तंत्रज्ञान क्षेत्रात चीनबरोबरील सहकार्य रोखण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर रशिया व चीन अधिक एकत्र येत असून त्यांनी आशिया, आफ्रिका तसेच इतर देशांना एकत्र घेऊन स्वतंत्र आघाडी तयार करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या गोष्टी जागतिक अर्थव्यवस्थेचे विभाजन होत असल्याचे दाखविणाऱ्या असल्याचे नाणेनिधीच्या प्रमुखंनी म्हटले आहे. असे विभाजन जागतिक अर्थव्यवस्थेच्या हिताचे नसून जग अधिकाधिक गरीब व असुरक्षित होईल, असे जॉर्जिव्हा यांनी बजावले.

यावेळी त्यांनी आपण पहिल्या शीतयुद्धात पोलादी पडद्याच्या आड होतो असे सांगून हा काळ अतिशय वेदनादायी होता, असा उल्लेख केला.

leave a reply