युद्ध सीमेवरून समाजापर्यंत येऊन पोहोचले आहे

- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा इशारा

पूणे – ‘आधीच्या काळाप्रमाणे युद्ध केवळ सीमेवर लढले जात नाही. तर बदलत्या काळानुसार युद्धाचे स्वरुप बदलून आता नागरी समाजात युद्ध पेटविणे आणि त्याद्वारे आपले राजकीय व लष्करी हेतू साध्य करणे किफायतशीर बनले आहे. जनतेचे आरोग्य, त्यांचे क्षेमकुशल व सुरक्षा, तसेच जनतेचा आपल्या सरकारवरील विश्‍वास या सार्‍याला हादरे देऊन देशाच्या इच्छाशक्तीवर प्रहार करणारे नवे युद्धतंत्र विकसित झाले आहे’, असे सांगून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी देशासमोर असलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांची जाणीव करून दिली.

युद्ध सीमेवरून समाजापर्यंत येऊन पोहोचले आहे - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा इशारा‘नॅशनल सिक्युरिटी प्रिपेडनेस इन द एज ऑफ डिझास्टर्स अँड पॅन्डॅमिक्स’ या विषयावर ‘पूने डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी-पीडीएनएस २०२१’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डोवल बोलत होते. व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी यावेळी देशासमोर खड्या ठाकलेल्या आव्हानांची परखड शब्दात जाणीव करून दिली. कोरोनाची साथ आणि यासारख्या राष्ट्रीय आपत्तींमुळे देशाच्या मनोधैर्यावर विघातक परिणाम होऊ शकतो, याकडे डोवल यांनी लक्ष वेधले. ‘कोरोनाची साथ व नैसर्गिक आपत्तींमुळे निर्माण झालेल्या सामाजिक असमतोलाने राजकीय स्थैर्य, आर्थिक प्रगती आणि देशांतर्गत आणि बाह्य आव्हानांना सामोरे जाण्याची देशाची क्षमता बाधित होते. हे देशाच्या सुरक्षेसमोर खडे ठाकलेले नवे धोके आहेत. त्यापासून विविध स्तरांवरील संभ्रम प्रचंड प्रमाणात वाढतो’, ही बाब डोवल यांनी लक्षात आणून दिली.

‘‘विषाणूंचा शस्त्रासारखा वापर करून जैविक युद्ध छेडण्याचे घातक प्रकार चिंता वाढविणारे आहेत. या विरोधात राष्ट्रीय पातळीवर क्षमता वाढविणे अत्यावश्यक बनले आहे. म्हणूनच ‘बायो-डिफेन्स’, ‘बायो-सेफ्टी’, ‘बायो-सिक्युरिटी’ अर्थात जैविक संरक्षण व सुरक्षेसाठी व्यापक व्यवस्था उभी करणे अनिवार्य ठरते. तसेच कोरोनाच्या साथीने येणार्‍या धोक्यांचा पूर्वविचार करण्याची व त्याला तोंड देण्याची तयारी आधीच करण्याची आवश्यकताही समोर आलेली आहे’’, असे सांगून डोवल यांनी पुढच्या काळातही कोरोनासारख्या साथीचे संकट पुन्हा उद्भवू शकते, असा सावधानतेचा इशारा दिला.

सुरक्षाविषयक पातळीवर जगभरात होत असलेल्या बदलांची जाणीव आपल्या सर्वांना होऊ लागली आहे. सीमेवरील युद्धांकडून आता नागरी समाजात संघर्ष पेटविण्याचे युद्धतंत्र विकसित झाले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाची क्रांती झालेल्या युगात अपप्रचार आणि दुष्ट हेतूने पसरविली जणारी चुकीची माहिती, यापासून आपल्या जनतेचे रक्षण करणे अतिशय आवश्यक बनले आहे. राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरणांची आखणी करताना, या सार्‍या गोष्टी विचारात घेऊन त्याविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविणे जिकरीचे बनलेले आहे’, असे डोवल पुढे म्हणाले.

हवामानबदल हा देशासमोरचा आणखी धोका असून याचे स्वरुप अनपेक्षित असल्याची बाब डोवल यांनी लक्षात आणून दिली. ‘यामुळे देशाकडे असलेले स्त्रोत प्रभावित होऊ शकतात. अन्नधान्याची टंचाई भासू शकते. यातून अंतर्गत संघर्ष भडकू शकतो. हवामानबदलाच्या प्रभावामुळे किनारपट्टीवरील जनता शहरांकडे धाव घेईल. आधीच वाढत्या जनसंख्येचा ताण सहन करणार्‍या शहरांची व्यवस्था यामुळे शकते, यातून तीव्र संघर्ष पेट घेऊ शकतो’, ही बाब देखील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी लक्षात आणून दिली.

भारताला जैविक युद्धापासून ते प्रचारयुद्धाचा धोका संभवतो व यांचा वापर करून देशात अस्थैर्य माजविण्याचे प्रयत्न परकीय शक्ती करीत आहेत, हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी नेमक्या शब्दात लक्षात आणून दिले. भारताची राजकीय व सामाजिक पातळीवरील व्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान आखून शत्रूदेश भारताच्या प्रगतीला खीळ घालण्याच्या तयारीत असल्याचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दिला आहे. यामुळे आधुनिक काळातील युद्ध सीमेवर नाही, तर देशांतर्गत पातळीवर लढणे भाग आहे, याची परखड जाणीव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी देशवासियांना करून दिलेली आहे.

leave a reply