भारत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

पंचकुला – ‘भारत शांतीप्रिय देश आहे. कुठल्याही स्वरुपाचा संघर्ष छेडणे भारताच्या सिद्धांतामध्ये नाही. मात्र आवश्यकता भासली तर भारत कुठल्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सज्ज आहे’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. ‘टर्मिनल बॅलेस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री बोलत होते. अणुस्फोटके वाहून नेऊ शकणार्‍या व पाच हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष अचूकतेने भेदणार्‍या ‘अग्नी-५’च्या यशस्वी चाचणीनंतर, संरक्षणमंत्र्यांची ही विधाने लक्षवेधी ठरतात.

भारत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगहरियाणाच्या पंचकुला येथे भेट देऊन संरक्षणमंत्र्यांनी क्षेपणास्त्र चाचणीची सुविधा असलेल्या तळाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना आपण लष्कराच्या कमांडर्स कॉन्फरन्समध्ये केलेल्या विधानांचा दाखला संरक्षणमंत्र्यांनी दिला. जगभरात सुरक्षाविषयक स्थितीत फार मोठ्या उलथापालथी होत आहेत आणि त्याचा वेगही अफाट आहे, याची चर्चा या कमांडर्स कॉन्फरन्समध्ये पार पडल्याची माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली. देशांमधील संबंध असो, व्यापार असो, आर्थिक-राजकीय-सुरक्षाविषयक संबंध असो, या सार्‍यांमध्ये झपाट्याने बदल पहायला मिळत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाची जबरदस्त वेगाने होत असलेली प्रगती देशाच्या सुरक्षेसाठी नवी आव्हाने घेऊन समोर येत आहे, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बदलत्या काळातील आव्हानांकडे लक्ष वेधले.

अशा परिस्थितीत देशाने कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सुसज्ज असले पाहिजे, असे सांगून यासंदर्भात माजी राष्ट्राध्यक्ष एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेल्या संदेशाची आठवण संरक्षणमंत्र्यांनी करून दिली. ‘‘या जगात भयाला स्थान असूच शकत नाही. एक शक्ती दुसर्‍या शक्तीचा आदर करते’, असे डॉ. कलाम म्हणाले होते. म्हणूनच आपल्याला भारताला सामर्थ्यशाली देश बनावायचे आहे. मोठ्या शक्तींच्या नजरेला नजर भिडविणारा भारत आपल्या सर्वांना अपेक्षित आहे’’, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली.

लडाखच्या एलएसीवर तणाव निर्माण झाल्यापासून चीन सातत्याने भारतावर लष्करी दडपण वाढविण्यासाठी हालचाली करीत आहे. त्याचवेळी चीनकडून भारताला सातत्याने धमक्या व इशारे मिळत आहेत. आजवर भारताने चीनबाबत दाखविलेला संयम सोडून भारतही चीनला त्याच भाषेत उत्तर देत आहे. भारतीय संरक्षणदलांचे अधिकारी आता उघडपणे चीनला इशारे देत आहेत. तसेच भारतीय नेत्यांनी देखील वेळोवेळी चीनला भारताच्या विरोधातील कारवायांच्या परिणामांची जाणीव करून दिलेली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी याआधीही भारत कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून चीन व पाकिस्तानला कडक शब्दात इशारे दिले होते. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या एलएसीजवळ आक्रमक हालचाली करणार्‍या चीनला भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा एकदा समज दिल्याचे या निमित्ताने समोर येत आहे.

leave a reply