पाश्चिमात्य देशांनी रशियाचे हितसंबंध लक्षात घ्यायला हवेत

-ज्येष्ठ अमेरिकी मुत्सद्दी हेन्री किसिंजर

लंडन – रशियाला युरोपातील चीनचे प्रभावकेंद्र बनवायचे नसेल, तर पाश्चिमात्य देशांनी रशियाचे हितसंबंध लक्षात घ्यायला हवेत असा सल्ला अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी दिला. ब्रिटनमधील ‘टाईम्स’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नाटोने रशियाविरोधात युक्रेनला केलेल्या सहाय्याची प्रशंसाही केली. पण त्याचवेळी रशिया-युक्रेन युद्ध संपवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे, असेही बजावले. यापूर्वी डॅव्होसमधील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत बोलताना किसिंजर यांनी, शांतीकरारासाठी प्रयत्न करायचे असतील तर युक्रेनने आपला थोडा भूभाग रशियाला द्यायला हवा, असे वक्तव्य करून खळबळ उडविली होती.

flags-Russia-Chinaरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून बहुतांश पाश्चिमात्य नेते व मुत्सद्दी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी छेडलेल्या युक्रेन युद्धावर जहाल शब्दात टीका करीत आहेत. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना धडा शिकवायला हवा व त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य पुरवायला हवे, असा सूर पाश्चिमात्य देशांनी लावून धरला आहे. अशा पार्श्वभूमीवर ज्येष्ठ मुत्सद्दी म्हणून ओळख असणाऱ्या किसिंजर यांनी रशियाबाबत घेतलेली मवाळ भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

Henry-Kissinger‘टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत किसिंजर यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चूक केल्याची टीकाही केली. युक्रेनच्या मुद्यावर पुतिन यांनी आपले संतुलन गमावल्याचा दावाही अमेरिकी मुत्सद्यांनी केला. मात्र असे असले तरी पाश्चिमात्य देशांनी रशियाकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला किसिंजर यांनी दिला.

अमेरिका व युरोपचे आशिया तसेच आखाती देशांबरोबरील संबंध सध्या तणावपूर्ण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. असे असताना वीनला आपला प्रभाव अधिक वाढविण्याची संधी देणे अमेरिकेच्या हिताचे ठरणार नाही, असा दावा किसिंजर यांनी केला आहे. जागतिक वर्चस्व ही चिनी संकल्पना नाही, पण ते त्या प्रमाणात सामर्थ्यशाली झाले तर ते पाश्चिमात्यांच्या हिताचे ठरणार नाही, असेही किसिंजर यांनी बजावले.

leave a reply