जागतिक आरोग्य संघटना चीनधार्जिणी असल्याचा जपानचा आरोप

टोकिओ – “जगापासून कोरोनाव्हायरसची लक्षणे लपविण्यार्या चीनबाबत नरमाईचे धोरण स्वीकारुन कम्युनिस्ट राजवटीचे समर्थन करणार्या ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) नाव बदलून ‘चायना हेल्थ ऑर्गनायझेशन’ (सीएचओ) करा”, असा जळजळीत शेरा जपानचे उपपंतप्रधान तारो आसो यांनी मारला. त्याचबरोबर ‘डब्ल्यूएचओ’चे अध्यक्ष चीनधार्जिणे धोरण राबवित असल्याचा आक्षेप जपानच्या उपपंतप्रधानांनी ही टीका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या बाजूने पक्षपात करीत असल्याचे आरोप केले होते.

दोन दिवसांपूर्वी जपानच्या संसदेत बोलताना, उपपंतप्रधान तारो आसो यांनी ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या हातातील खेळणे बनल्याची टीका केली. “काही वर्षांपूर्वी या संघटनेच्या प्रमुख चिनीवंशिय होत्या. तेव्हा ही संघटना चीनधार्जिणे निर्णय घेत असल्याचे आरोप जगभरातून केले जात होते. पण ‘डब्ल्यूएचओ’चे विद्यमान अध्यक्ष देखील याहून वेगळे नाहीत”, असा आरोप आसो यांनी केला. यासाठी ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांविरोधात सुरू असलेल्या ऑनलाईन मोहिमेचा दाखला उपपंतप्रधानांनी दिला.

जगभरातील तीन ते पाच लाख जणांनी  ‘डब्ल्यूएचओ’मध्ये फेरबदल करावे असे ऑनलाईन मोहिमेत सुचविले आहे. काहींनी तर, या संघटनेचे प्रमुख चीनच्या इशार्यावर काम करीत असल्याचा ठपका ठेवला, याची माहिती उपपंतप्रधान आसो यांनी संसदेत दिली. त्यामुळे, ‘डब्ल्यूएचओ’चे नाव बदलून ‘सीएचओ’ अर्थात ‘चायना हेल्थ ऑर्गनायझेशन’ करावे. जगभरातील जनतेची देखील हीच मागणी असल्याचे आसो यांनी सांगितले.

“चीनमधील कोरोनाव्हायरसची खरी माहिती दडविली नसती तर, आज जगातील प्रत्येक देशाने या साथीकडे अधिक गांभिर्याने पाहून आवश्यक खबरदारी घेतली असती. पण त्याऐवजी ‘डब्ल्यूएचओ’ने चीनच्या सूचनांचे पालन करुन जगाला संकटाच्या खाईत ढकलले आहे”, असा घणाघाती हल्ला आसो यांनी चढविला. याआधीही ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख ‘टेड्रॉस घेब्रेस्यूएस’ यांचे चीनबरोबर छुपे व्यवहार असल्याचा आरोप झाला होता.  अमेरिकेच्या सिनेटर्सनी देखील ‘डब्ल्यूएचओ’ आणि या संघटनेचे प्रमुख घेब्रेस्यूएस यांच्यावर आगपाखड केली आहे.

चीनच्या बचावासाठी कोरोनाव्हायरसविषयी खोटी माहिती देऊन जगभरातील जनतेला संकटात टाकणार्या ‘डब्ल्यूएचओ’ची चौकशी व्हावी, या संघटनेच्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी अमेरिकी लोकप्रतिनिधी रिक स्कॉट यांनी केली. त्याचबरोबर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची मोहीम राबविणार्या ‘डब्ल्यूएचओ’वर यापुढे अमेरिकी करदात्यांचा पैसा खर्च करायचा का, असा सवालही स्कॉट यांनी केला. महिन्याभरापूर्वी स्कॉट यांनी चीन कोरोनाव्हायरसबाबत दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवू शकत नसल्याचे म्हटले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या बाजूने पक्षपात करीत असल्याचे म्हटले होते. ही बाब उघडपणे दिसत असून, हे दुर्दैवी असल्याचे ट्रम्प यांनी सांगून ‘डब्ल्यूएचओ’ला फटकारले होते. यामुळे लवकरच अमेरिका चीनधार्जिणी भूमिका घेणार्या ‘डब्ल्युएचओ’ला लक्ष्य करण्याचे संकेत मिळाले होते. याला जपानचीही साथ मिळत असल्याचे दिसत आहे.

leave a reply