जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली आहे – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जीनिव्हा – ‘डेल्टा व्हेरिअंट’च्या वाढत्या फैलावामुळे कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला मिळालेले यश धुळीला मिळत असून जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली आहे, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिअंट’ जगातील 111 देशांमध्ये फैलावला असून गेले चार आठवडे सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याकडे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनी लक्ष वेधले. ‘डब्ल्यूएचओ’ तिसर्‍या लाटेची जाणीव करुन देत असतानाच, ब्रिटनच्या प्रमुख वैद्यकीय संघटनेने ब्रिटीश सरकारच्या ‘अनलॉक’च्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

तिसरी लाट

2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात उडविलेला हाहाकार अद्यापही कायम आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू झाली आहे. जगभरात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या 40 लाखांवर गेली असून संसर्ग झालेल्यांची आकडेवारी 18.8 कोटींवर गेली आहे. अमेरिका व युरोपमधील अनेक देशांनी कोरोना साथीच्या काळात लागू केलेले निर्बंध शिथिलही करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून जगभरात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ने दिला आहे.

‘काही महिन्यांपूर्वी अमेरिका व युरोपिय देशांनी कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढविला होता. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण व बळींची संख्या घटली होती. मात्र दुर्दैवाने हा कल उलट फिरण्यास सुरुवात झाली असून जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आहे’, असे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनी बजावले. ‘डेल्टा व्हेरिअंट’चा वाढता प्रसार, अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी उसळणारी गर्दी व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन यामुळे कोरोनाची तिसरी लाट फैलावू लागल्याचा दावा त्यांनी केला. गेले चार आठवडे विविध देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, 10 आठवड्यांच्या कालावधीनंतर बळींची संख्याही पुन्हा वाढू लागली आहे, याकडेही घेब्रेस्यूस यांनी लक्ष वेधले.

तिसरी लाट‘डब्ल्यूएचओ’कडून तिसर्‍या लाटेबद्दल स्पष्ट संकेत देण्यात येत असतानाच, ब्रिटनमध्ये ‘अनलॉक’ची तयारी सुरू झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 19 जुलै पासून निर्बंध शिथिल करण्याचे जाहीर केले आहे. ब्रिटीश सरकारच्या या निर्णयावर देशातील प्रमुख वैद्यकीय संघटना ‘ब्रिटीश मेडिकल असोसिएशन’ने तीव्र टीकास्त्र सोडले आहे. कोरोनासंदर्भातील सर्व निर्बंध 19 जुलैपासून शिथिल करण्याचा निर्णय अत्यंत बेजबाबदार व धोकादायक असल्याचे ‘ब्रिटीश मेडिकल असोसिएशन’ने बजावले आहे.

ब्रिटनमधील बहुसंख्य जनतेचे लसीकरण पूर्ण झाले नसताना ‘अनलॉक’ करण्याचा निर्णय कोरोनाची पकड पुन्हा घट्ट करणारा ठरु शकतो, असा दावा वैद्यकीय संघटनेने केले आहे. ब्रिटनमध्ये गेले सात दिवस 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असून बळींची संख्या एक लाख, 29 हजारांवर गेली आहे.

दरम्यान, लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये कोरोनामुळे बळी जाणार्‍यांची संख्या एक लाखांवर जाऊन पोहोचली आहे. जगभरात एक लाखांहून अधिक बळी जाणारा अर्जेंटिना हा 11वा देश ठरला आहे. लॅटिन अमेरिकेत ब्राझिल, पेरु, मेक्सिको व कोलंबिया या देशांमध्ये एक लाखांहून अधिक बळींची नोंद झाली असून अर्जेंटिना पाचवा देश ठरला आहे. अर्जेंटिनात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 47 लाखांवर जाऊन पोहोचली आहे.

leave a reply