कोरोनापेक्षाही घातक विषाणू अधिक भयंकर साथ पसरविल – जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा इशारा

जीनिव्हा – ‘कोरोनाची साथ ही जगातील शेवटची साथ आहे, असे समजण्याची चूक करु नका. उत्क्रांतीच्या नियमानुसार, कोरोनाव्हायरसहून अधिक घातक व वेगाने फैलावणारा विषाणू समोर येऊ शकतो. हा विषाणू जगात नव्या साथीला निमंत्रण देणारा ठरेल’, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी दिला. 74व्या ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’चे उद्घाटन करताना हा इशारा देणार्‍या घेब्रेयेसूस यांनी, जग सध्या निर्णायक वळणावर असून जुन्या मार्गाने गेल्यास पुढील संकटांना तोंड देणे कठीण होईल, असेही बजावले.

कोरोनापेक्षाही घातक विषाणू2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात 16 कोटींहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या 34 लाखांवर गेली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवे ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या प्रमुखांनी नव्या साथीबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

कोरोनापेक्षाही घातक विषाणूकोरोनाची साथ सुरू असतानाच नव्या साथीबाबत इशारा देण्याची ही वर्षभरातील दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या एका बैठकीतही डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी, जगाने नव्या साथीसाठी तयार रहावे असे बजावले होते. त्याचवेळी पुढील साथीसाठी जगाने आतापेक्षा जास्त तयारी करायला हवी, असेही सांगितले होते. सोमवारी ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’मध्ये केलेल्या भाषणात याचा पुनरुच्चार करताना जगासमोर आता दोनच पर्याय असल्याचा इशारा त्यांनी दिला. सहकार्य किंवा असुरक्षितता हे ते पर्याय असल्याची जाणीव डॉ. घेब्रेयेसूस यांनी करून दिली.

कोरोनापेक्षाही घातक विषाणूदरम्यान, ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’च्या बैठकीदरम्यान, कोरोनाच्या उगमाबाबत नव्याने पारदर्शक चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेचे आरोग्यमंत्री झेविअर बेकेरा यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ‘कोरोना साथीच्या मुळाबाबत ‘फेज-2’ चौकशी सुरू व्हायला हवी. ही चौकशी अधिक पारदर्शक, वैज्ञानिक तथ्यांवर आधारलेली व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना पूर्ण स्वातंत्र्य देणारी हवी’, असे बेकेरा यांनी म्हटले आहे.

यापूर्वी आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या चौकशीत कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नसून जगातील आघाडीच्या देशांनी त्यावर तीव्र टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे दडपणाखाली आलेल्या डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी, सदस्य देशांमध्ये एकमत झाल्यास नव्याने चौकशी करणे शक्य आहे, असे संकेत दिले होते.

leave a reply