राजधानी बीजिंगसह चीनमधील प्रमुख विद्यापीठांमध्ये कोरोना निर्बंधांच्या विरोधात व्यापक निदर्शने

- कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांनजिक

कोरोना निर्बंधांच्या विरोधातबीजिंग/शांघाय – ‘झीरो कोविड पॉलिसी’च्या अन्याय्य अंमलबजावणीविरोधातील चिनी जनतेच्या असंतोषाने व्यापक रुप धारण केले आहे. शनिवारी व रविवारी चीनची राजधानी बीजिंग, आर्थिक केंद्र शांघायसह देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये कोरोना निर्बंधांच्या विरोधात तीव्र निदर्शने झाली. यावेळी ‘जिनपिंग स्टेप डाऊन’, ‘कम्युनिस्ट पार्टी स्टेप डाऊन’, ‘फ्रीडम’ अशा घोषणाही देण्यात आल्या. बीजिंगसह देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात दिसून आलेली नाराजी जिनपिंग यांच्या राजवटीसमोर उभे राहिलेले मोठे आव्हान ठरते, असा दावा पाश्चिमात्य विश्लेषकांनी केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये कोरोनाची साथ पुन्हा एकदा फैलावत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिअंटचे वेगवेगळे उपप्रकार चीनमध्ये आढळले आहेत. चीनच्या पश्चिम भागातील झिंजिआंग व तिबेटपासून ते पूर्वेकडे राजधानी बीजिंगपर्यंत जवळपास सर्वच भागांमध्ये कोरोनाचे मोठे उद्रेक होत आहेत. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने राबविलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ व लसीकरणाच्या दाव्यांनंतरही कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयश आले आहे. काही विश्लेषक तसेच सोशल मीडिया पोस्टस्‌‍मधून, कम्युनिस्ट राजवट जाणूनबुजून जनतेवर लादलेले निर्बंध कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दावेही समोर आले आहेत.

कोरोना निर्बंधांच्या विरोधातया पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चीनच्या विविध भागांमध्ये होणारी निदर्शने लक्ष वेधून घेणारी ठरतात. गेल्या आठवड्यात चीनचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ग्वांगझाऊ तसेच झेंगझोऊ शहरातील फॅक्टरीत हिंसक निदर्शने झाली होती. झेंगझोऊमध्ये ‘आयफोन’ फॅक्टरीत झालेल्या निदर्शनांमध्ये कामगार व सुरक्षादलांमध्ये जबरदस्त संघर्ष झाल्याचे फोटोग्राफ्स समोर आले होते. त्यानंतर चीनच्या प्रमुख शहरांमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून निर्बंध म्हणून उभारलेले अडथळे हटवित आपला असंतोष व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. गेल्या आठवड्यात उरुम्कि शहरात लागलेली आग व जीवितहानीच्या घटनेने चिनी जनतेच्या नाराजीचा उद्रेक झाल्याचे समोर येत आहे.

कोरोना निर्बंधांच्या विरोधातशनिवारपासून चीनची राजधानी बीजिंग, आर्थिक केंद्र शांघाय तसेच नानजिंगसह अनेक शहरांमध्ये चिनी नागरिक निदर्शनांसाठी रस्त्यावर उतरले. चीनमधील आघाडीच्या विद्यापीठांपेकी असलेल्या ‘शिंगुआ युनिव्हर्सिटी’सह देशातील तीन प्रमुख विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी ‘झीरो कोविड पॉलिसी’ तसेच उरुम्किमधील घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी हातात कोरे फलक घेऊन उभे राहणे, मेणबत्त्या लावणे, मोबाईल्स तसेच भिंतीवर घोषणा लिहिणे यासारख्या कृतींमधून विद्यार्थ्यांनी राजवटीविरोधातील नाराजी व्यक्त केली. चिनी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी अशा रितीने व्यापक प्रमाणात राजवटीविरोधात निदर्शने करण्याची १९८९ सालानंतरची ही पहिलीच घटना ठरते.

चिनी जनतेने रस्त्यावर उतरण्याबरोबरच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व कम्युनिस्ट राजवटीविरोधात दिलेल्या घोषणा ही महत्त्वाची बाब ठरते याकडे परदेशातील चिनी विश्लेषक तसेच माध्यमांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी देशाच्या सर्व भागांमधून ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात उमटणारा आक्रोश कम्युनिस्ट राजवटीसमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरु शकते, असा दावाही केला. दरम्यान, कोरोनाचे निर्बंध अधिक तीव्र होत असतानाही रुग्णसंख्येत पडणारी भर कायम राहिली आहे. शनिवारी चीनमध्ये ३९ हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी दिली.

English हिंदी

leave a reply