‘झीरो कोविड पॉलिसी’च्या विरोधात चीनच्या झिंजिआंगमध्ये तीव्र निदर्शने

शुक्रवारी कोरोनाचे 35 हजार नवे रूग्ण आढळले

Zero Covid Policyबीजिंग/उरुम्कि – सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या व त्यापाठोपाठ लागू होणारे कठोर निर्बंध याविरोधात चिनी जनतेत असलेला तीव्र असंतोष उफाळून वर आला. गुरुवारी चीनच्या झिंजिआंग प्रांतात लागलेल्या एका आगीनंतर शुक्रवारी राजधानी उरुम्किमधील नागरिकांनी कोरोनाचे निर्बंध झुगारून रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. यावेळी नागरिकांनी कोरोनाचे निर्बंध उठविण्याची मागणी करीत स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. उरुम्कित तैनात असणाऱ्या सुरक्षादलांविरोधात झटापट झाल्याची माहितीही सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या पोस्टस्‌‍मध्ये देण्यात आली आहे.

china fireगुरुवारी रात्री चीनच्या पश्चिम भागात असणाऱ्या झिंजिआंग प्रांताची राजधानी उरुम्किमधील एका बहुमजली इमारतीला आग लागली. ही इमारत व जवळच्या परिसरात कोरोनाच्या निर्बंधांमुळे अडथळे उभारण्यात आले होते. इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमनदलाला फोन केल्यानंतर तब्बल तासाभराने गाड्या परिसरात हजर झाल्या. मात्र अडथळे हटविण्यात वेळ गेल्याने आग विझविण्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागला. या काळात इमारतीतील रहिवाशांना परिसराच्या बाहेर पडण्यासही मज्जाव करण्यात आला. या सर्व घटनाक्रमात इमारतीतील 10 जणांचा बळी गेला असून नऊ जण जखमी झाले आहेत.

सोशल मीडियावर उघूरवंशिय गटांनी टाकलेल्या पोस्टमध्ये इमारतीतील आगीत तब्बल 44 जणांचा बळी गेल्याचा दावा करण्यात आला. काही पोस्टमध्ये स्थानिक प्रशासन व सरकारी यंत्रणांनी दाखविलेल्या बेपर्वाईचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी संध्याकाळी उरुम्किमधील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरातील प्रशासकीय कार्यालयावर धडक देत कोरोना निर्बंध उठविण्याची मागणी केली. इमारतीतील आगीत झालेल्या जीवितहानीसाठी कोरोना निर्बंधच कारणीभूत ठरल्याचा आरोपही निदर्शकांनी यावेळी केला. स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या पोस्टस्‌‍मधून दिसत आहे.

China's Xinjiangचीनमधील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने साथीविरोधातील निर्बंध अधिकच तीव्र केले आहेत. सत्ताधारी राजवटीच्या या कठोर निर्बंधांविरोधात जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात उरुम्किबरोबरच शांघाय, अन्हुई, ग्वांगझाऊ व झेंगझोऊ यासारख्या शहरांमध्येही निदर्शने झाली. या निदर्शनांमध्ये दीर्घकाळपर्यंत लागू असलेल्या कोरोना निर्बंधांविरोधातील नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र जनतेत असंतोष असतानाही चीनची कम्युनिस्ट राजवट ‘झीरो कोविड पॉलिसी’ मागे घेण्यास तयार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व इतर नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

दरम्यान कोरोना निर्बंधांमुळे चीनमधील रुग्णसंख्येत घट होण्याऐवजी त्यात अधिकाधिक भर पडत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी चीनमध्ये 35 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. यावर्षी चीनमध्ये झालेल्या कोरोनाच्या उद्रेकांमधील ही 24 तासांमधील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरते.

leave a reply