चीनबरोबर मुकाबल्यासाठी खडे ठाकावे लागेल – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – चीन सीमेवरील परिस्थिती आणि चीनबरोबरील द्विपक्षीय संबंधांना वेगळे करून पाहता येणार नाही. सीमेवरील चीनच्या कुरापतींचा परिणाम चीनबरोबरील व्यापारावर पडणे साहजिक आहे, असे स्पष्ट शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बजावले आहे. तसेच भारताला चीनबरोबर मुकाबला करण्यासाठी खडे ठाकावेच लागेल, असे सांगून चीनला खरमरीत इशारा दिला आहे. सीमेवरील तणावावरून भारत आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पुढील टप्प्यातील चर्चा सुरु होण्याआधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा इशारा देऊन भारत चीनवरील दडपण कमी करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

एस. जयशंकर

लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाला ९० दिवस उलटले आहेत आणि हा तणाव कमी करण्यासाठी पाचव्या टप्प्यातील चर्चा सुरु झाली आहे. पॅंगोन्ग त्सो सरोवर क्षेत्राच्या फिंगर ४ आणि फिंगर ८ मधून चीनने सैन्य माघारी घेण्याचे याआधीच्या बैठकीत आश्वासन दिले होते. मात्र नेहमीप्रमाणे चीनने याबाबतीत विश्वासघात केला आहे. यामुळे पाचव्या टप्पातील चर्चा रद्द करण्यात आली होती. मात्र रविवारी ही बैठक सुरु झाली.

चीन पॅंगोन्ग त्सो बाबत चर्चा करण्यास तयार नसल्याचे याआधी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पॅंगोन्ग त्सो सरोवराच्या भागातील चीनची तैनाती सर्वात मोठा वादाचा भाग ठरत आहे. भारतानेही पॅंगोन्ग त्सोच्या मुद्यावर चर्चेशिवाय कोणत्याही मुद्यांवर पुढे जाणार नाही. चीनला या भागातून जवान मागे घ्यावेच लागतील, असे चीनला निक्षून सांगितल्याचे वृत्त आहे.

एस. जयशंकर

त्यामुळे या बैठकीच्या काही तास आधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चीनला दिलेल्या इशाऱ्याचे महत्व वाढत आहे. गेल्या तीन दशकांपासून सीमेवर शांतता राहील असे गृहीत मानून भारताने चीनबरोबरील संबंध सामान्य करण्यावर भर दिला. हा सरकारच्या धोरणाचा भाग राहिला. यामुळेच सीमेवरील परिस्थिती आणि भविष्यातील दोन्ही देशातील संबंधांना वेगळे करून पाहता येणार नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अधोरेखित करून सांगितले. चीनच्या समभुज पोहोचणे सोपी गोष्ट नाही. मात्र हा परीक्षेचा काळ असून भारताला मुकाबल्यासाठी खडे ठाकावेच लागेल, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

तसेच सीमेवरील वादाचा परिणाम व्यापारावर होईल, हे साहजिकच आहे, असेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. दोनच दिवसांपूर्वी चीनचे भारतातील राजदूत सन वेईडोन्ग यांनी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध जबरदस्तीने तोडण्याचे प्रयत्न झाल्यास दोन्हीही देशांना याचे फार मोठे नुकसान सहन करावे लागेल, असा दावा केला होता. यापार्श्वभूमीवरही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले आहे.

leave a reply