भारताच्या विकासाबरोबर जगाचाही विकास होतो

- संयुक्त राष्ट्रसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

संयुक्त राष्ट्रसंघ – ‘हजारो वर्षांची लोकशाहीवादी परंपरा लाभलेली भारतभूमी ही लोकशाहीची जननी ठरते. भारत ज्यावेळी विकास करतो, त्यावेळी जगाचा विकास होतो. भारतात सुधारणा होतात, त्यावेळी जगाचा कायापालट होतो’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील भाषणात भारताला लोकशाहीवर उपदेश करणार्‍यांना चपराक लगावली. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघाला आपली प्रासंगिकता टिकवायची असेल, तर काळाबरोबर आवश्यक बदल घडवायलाच हवे, असे सांगून पंतप्रधानांनी यासाठी आचार्य चाणक्य यांच्या उद्गारांचा दाखला दिला. भारतासारख्या देशाला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्त्व दिले नाही, तर राष्ट्रसंघ आपला प्रभाव गमावून बसेल, हा इशारा याद्वारे पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे दिसत आहे.

भारताच्या विकासाबरोबर जगाचाही विकास होतो - संयुक्त राष्ट्रसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशसंयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच कोरोनाच्या साथीने बळी घेतलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. या साथीने जगाला आर्थिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा धडा दिला आहे. जागतिक उत्पादनासाठी पुरवठा साखळी सुनिश्‍चित करण्याची गरज आहे आणि भारत या आघाडीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. सध्या जगाची फॅक्टरी मानल्या जाणार्‍या चीनमध्ये कोरोनाच्या साथीनंतर उत्पादन थंडावले होते. याचा दाखला देऊन पंतप्रधानांनी थेट उल्लेख न करता भारत हा चीनला अधिक समर्थ पर्याय ठरेल, असा संदेश दिला. त्याचबरोबर भारताने कोरोनाप्रतिबंधक लस विकसित करून दाखविली व विकसित देशांनाही या आघाडीवर मागे टाकले आहे. लवकरच १२ वर्षांवरील मुलांना भारताने विकसित केलेली लस देण्यात येणार आहे. भारतीय संशोधक कोरोनाप्रतिबंधक नेजल व्हॅक्सिन तयार करीत आहेत. जगभरातील कंपन्यांनी भारतात येऊन लसनिर्मिती करावी, असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.

गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या लोकशाहीवर पाश्‍चिमात्य माध्यमांनी शेरेबाजी सुरू केली होती. त्याची दखल घेऊन पंतप्रधानांनी भारत ही लोकशाहीची जननी असल्याची आठवण करून दिली. भारताला हजारो वर्षांची लोकशाहीवादी परंपरा लाभलेली आहे आणि वैविध्य हे आत्ताच्या भारताच्या लोकशाहीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. अशा लोकशाहीवादी भारताचा विकास होतो, त्यावेळी जग अधिक विकास करते. भारत सुधारणा घडवितो, त्यावेळी जगात सुधारणा होतात, असे सांगून पंतप्रधानांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचवेळी थेट नामोल्लेख टाळून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर पंतप्रधानांनी कठोर शब्दात प्रहार केले.

दहशतवादाचा हत्यारासारखा वापर करून राजकीय हेतू साधू पाहणार्‍या देशांनी दहशतवाद हे त्यांच्यासाठीही तितके भयंकर संकट ठरेल, हे लक्षात घेतलेले बरे. त्याचवेळी अफगाणिस्तानसारख्या देशाचा दहशतवादासाठी वापर होणार नाही, हे जगाने सुनिश्‍चित करायला हवे, अशी मागणी यावेळी पंतप्रधानांनी केली. अफगाणिस्तानातील नाजूक बनलेल्या परिस्थितीचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी अवजारासारखा वापर करीत नाही, याबाबत जगाने सावध रहावे, असा इशाराही यावेळी पंतप्रधानांनी दिला. कायद्यावर आधारित व्यवस्थेसाठी सार्‍या जगाने एकजुटीने आवाज उठविणे अत्यावश्यक आहे, असा संदेशही यावेळी पंतप्रधानांनी दिला. पंतप्रधान मोदी यांच्या या भाषणाची दखल भारतीय माध्यमांबरोबरच पाश्‍चिमात्य माध्यमांनीही घेतली आहे. विशेषतः क्वाडमधील भारताच्या भूमिकेला फार मोठे महत्त्व आल्याचे पाश्‍चिमात्य माध्यमेही मान्य करू लागली आहेत.

leave a reply