जगातील इंधनविषयक क्षमता संपुष्टात येत आहे

- सौदी, युएईच्या नेत्यांचा इशारा

दुबई – जगाची सर्व स्तरांवरील इंधनविषयक क्षमता संपुष्टात येत आहे. ही वाढवायची असेल तर या क्षेत्रात अधिक गुंतवणूक आवश्यकअसल्याचा इशारा सौदी अरेबिया आणि युएईच्या इंधनमंत्र्यांनी दिला. त्याचबरोबर अमेरिकेच्या सिनेटने संमत केलेल्या ‘नोपेक’ बिलमुळे इंधनाचे दर 200 ते 300 टक्क्यांनी वाढतील, अशी धमकी युएईच्या मंत्र्यांनी दिली.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या जगभरात इंधनाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याआधी कधीही अशी स्थिती निर्माण झाली नव्हती, अशी कबुली सौदीचे इंधनमंत्री प्रिन्स अब्दुलअझीझ बिन सलमान यांनी दिली. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने वास्तवाचे भान ठेवावे, असे आवाहन प्रिन्स अब्दुलअझीझ यांनी केले. तर इंधनविषयक क्षमता संपुष्टात येत असताना आंतरराष्ट्रीय समुदायाने या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवावी, अशी अपेक्षा युएईचे इंधनमंत्री सुहेल अल मझरुई यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर जगभरात कोसळलेल्या इंधनसंकटासाठी ‘ओपेक’ सदस्य देशांना विनाकारण लक्ष्य केले जात असल्याची टीका मझरुई यांनी केली. ‘ओपेक आणि ओपेक प्लसच्या इंधन पुरवठा साखळीला हादरा देण्याचा प्रयत्न झालाच तर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर 300 टक्क्यांनी वधारतील. ही परिस्थिती जगात कुणीही हाताळू शकत नाही’, असा इशारा युएईच्या इंधनमंत्र्यांनी दिला.

leave a reply