‘वुहान डायरी’च्या लेखिकेला चीनमधून जीवे मारण्याच्या धमक्या

वुहान – कोरोनाव्हायरसचे उगमस्थान असलेल्या वुहानमधील लॉकडाउनचे सत्य जगासमोर मांडणाऱ्या चिनी लेखिका ‘फँग फँग’ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. फँग यांची ‘वुहान डायरी’ पाश्चिमात्य देशांमध्ये प्रसिद्ध होणार असल्याने त्यांना या धमक्या मिळू लागल्या आहेत. चीनने जाणूनबुजून वुहानमधील परिस्थिती दडवून ठेवल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावरुन तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर फँग यांची ‘वुहान डायरी’ आतपर्यंत जगासमोर न आलेल्या गोष्टी उघड करुन चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढवू शकेल. याची जाणीव झाल्यामुळे चीनकडून फँग फँग यांना धमकावले जात असल्याचे दिसते.

फँग फँग ह्या नावाने लेखन करणाऱ्या चीनमधील मोठ्या लेखिका असून २०१० साली त्यांना देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चीनमध्ये त्यांचा एक वाचकवर्गही आहे. २३ जानेवारी रोजी चीन सरकारने वुहान शहरात लॉकडाउन लागू केला. फँग या वुहानच्या नागरिक असल्यामुळे त्यांनी ‘ऑनलाईन जर्नल’च्या माध्यमातून या लॉकडाउनची दैनंदिनी लिहिण्यास सुरुवात केली. यामध्ये फँग यांनी लॉकडाउनच्या काळातील वुहान शहर, वैद्यकीय सुविधा, चिनी पोलिसांची कारवाई आणि आपल्या मित्रांचे अनुभव या जर्नलच्या माध्यमातून जगासमोर मांडले होते.

मानवी संसर्गाने कोरोनाव्हायरसचा फैलाव होतो, याबाबत वुहानमधील डॉक्टर्सनी आपल्या वरिष्ठांना फार आधीच कळविले होते. तरीही याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही आणि चीनच्या राजवटीने वुहानमधील जनतेला याबाबत सावध केले नाही, असे आपल्या एका डॉक्टरमित्राने म्हटल्याचे फँग यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच १३ फेब्रुवारी रोजी फँग यांनी लिहिलेले वुहानच्या दफनभूमीतील विदारक सत्य जगाला हादरवून सोडणारे होते. एका डॉक्टरने पुरविलेल्या फोटोद्वारे दफनभूमीत मृतदेहांचा आणि त्यांच्या मोबाईल फोन्सचा ढीग पडलेला दाखविण्यात दिसत होता.

१७ फेब्रुवारी रोजीच्या पोस्टमध्ये वुहान शहरावर मोठी आपत्ती कोसळल्याचा दावा फँग यांनी केला होता. शहरातील रुग्णालयांमध्ये दर दिवशी मृत्युपत्राची एक पुस्तिका वापरली जात होती. त्याचबरोबर मृतदेहांनी भरलेल्या रुग्णवाहिका दफनभूमीतून तशाच माघारी फिरत होत्या, असे फँग यांनी लिहिले होते. कारण दफनभूमीत मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नव्हती, असे फँग यांनी लिहिले हिते. तसेच शहरातील रुग्णालये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांनी भरलेली असून काही रुग्णालयांनी रुग्ण स्वीकारण्यास नकार दिला होता. मास्कचा तुटवडा, वैद्यकीय साहित्य आणि ‘पीपीई’चा अभाव यावरही फँग यांनी लिहिले होते.

सुरुवातीला फँग यांच्या पोस्टला चांगली दाद मिळत होती. पण पुढच्या काळात फँग यांच्या पोस्ट डिलिट करण्यात आल्या. चीनमधील सोशल मीडियावरील त्यांचे अकाउंटदेखील बंद करण्यात आले होते. स्थानिक माध्यमाशी बोलताना फँग यांनी ही माहिती दिली. फँग यांच्या चिनी माध्यमातील या पोस्ट डिलिट झाल्या असल्या तरी पाश्चिमात्य माध्यमांनी त्याची दखल घेतली असून अमेरिका आणि जर्मनीतील दोन वितरकांनी फँग यांच्या ‘वुहान डायरी’ या ऑनलाईन जर्नलचे पुस्तक प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले आहे.

या घोषणेबरोबर फँग यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या समर्थकांनी फँग यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून या धमकींचे वुहान पोस्टर शहरात लावण्यात आले आहेत. आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची चिंता फँग यांनी व्यक्त आहे. चीन सरकारने यावर प्रतिक्रीया दिलेली नाही. पण ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी मुखपत्राने फँग यांच्यावरच टीकेची झोड उठविली आहे. फँग यांचे लिखाण चीन विरोधी देशांना खाद्य पुरविणारे ठरणार असल्याचे ताशेरे या मुखपत्राने ओढले आहेत.

leave a reply