कोरोनाला चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळा जबाबदार

रशियन प्राध्यापकाचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को, (वृत्तसंस्‍था) – ‘वुहानच्या प्रयोगशाळेतील संशोधक गेली दहा वर्षे कोरोनाव्हायरसच्या वेगवेगळ्या प्रकारांवर संशोधन करीत होते. त्यांच्या मूर्खपणामुळेच आज हे संकट ओढवले आहे’, असा खळबळ माजविणारा दावा रशियन प्राध्यापक पेट्र शुमाकोव्ह यांनी केला. दोन दिवसांपूर्वी फ्रान्सचे नोबेल विजेते शास्त्रज्ञ लुक मौंटेनीर यांनीही या साथीची निर्मिती वुहान प्रयोगशाळेतच झाल्याचे ठासून सांगितले होते. याआधीच अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांनी घेरल्यामुळे अडचणीत सापडलेल्या चीनला आत्ता संशोधकांनी नोंदविलेल्या निष्कर्षाला शास्त्रीय पुराव्यानीशी उत्तर द्यावे लागणार आहे. सध्यातरी या आघाडीवर चीनकडे समाधानकारक उत्तर नसल्याचे दिसत आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमधील ‘एंजलहार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी’मध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक असलेल्या शुमाकोव्ह यांनी स्थानिक वर्तमानपत्राशी बोलताना ही माहिती दिली. ‘चीनच्या वुहान प्रयोगशाळेत संशोधक कोरोनाच्या प्रकारांवर संशोधन करीत आहेत. या संशोधना दरम्यान ते कित्येकदा मुर्खासारखे प्रयोग करतात’, असे सांगून चिनी संशोधकांच्या काही अचरट प्रयोगांचे दाखलेही शुमाकोव्ह यानी दिले.

दोन दिवसांपूर्वी रशियाच्या माजी आरोग्यमंत्री आणि ‘फेडरल मेडिकल-बायोलॉजिकल एजन्सी’च्या प्रमुख ‘वेरोनिका स्वोर्त्सोवा’ यांनीही कोरोनाव्हायरस मानवनिर्मित विषाणू असल्याची शक्यता वर्तविली होती. याआधी चीनमधूनच जगभरात पसरलेल्या सार्स आणि सध्याच्या कोरोनाव्हायरस यांच्यातील फ्रॅग्मेंट्स ९४ टक्के समान असल्याचा निष्कर्ष वेरोनिका यांनी नोंदविला होता.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी फ्रेंच नोबेल विजेते शास्त्रज्ञ लुक मौंटेनीर यांनीही वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती झाल्याचे सांगितले होते. साधारण वीस वर्षांपूर्वीपासून वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोनाव्हायरसवर संशोधन सुरू होते व या संशोधनात चीनने चांगलीच पकड मिळविली, या मौंटेनीर यांनी केलेल्या दाव्याला रशियन प्राध्यापक शुमाकोव्ह यांनी दिलेली माहिती दुजोरा देणारी आहे. रशियासारख्या चीनबरोबर उत्तम संबंध राखून असणाऱ्या देशाने केलेला हा आरोप चीनच्या समोरील अडचणीत वाढ करणार आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीने रशियात साडेपाचशेहून अधिक जणांचे बळी घेतले असून  ६२ हजार रशियन्सना या साथीची लागण झाली आहे. ही साथ म्हणजे रशियासमोर खड्या ठाकलेल्या सर्वात भयंकर आव्हानांपैकी एक ठरेल, अशी परखड जाणीव रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या देशबांधवांना करून दिली आहे. चीनबरोबर उत्तम संबंध राखणे हा रशियाच्या अमेरिकाविरोधी नीतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असला तरी कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे रशियातही चीनच्या विरोधात वातावरणाची निर्मिती होऊ लागल्याचे दिसत आहे. प्राध्यापक शुमाकोव्ह यांनी वुहानच्या प्रयोगशाळेत होणार्‍या प्रयोगांची माहिती देऊन हा मूर्खपणा असल्याचा मारलेला शेरा ही बाब अधोरेखित करीत आहे.

leave a reply