इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांचा युएईचा ऐतिहासिक दौरा

- अबु धाबीमध्ये इस्रायलचा दूतावास सुरू

अबु धाबी – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपीड मंगळवारी ‘संयुक्त अरब अमिरात-युएई’मध्ये दाखल झाले. यावेळी परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी अबु धाबीमध्ये आखातातील इस्रायलचे पहिले दूतावास सुरू केले. त्याचबरोबर ही एक ऐतिहासिक घटना असून आखातातील इतर देशांनीही इस्रायलबरोबरच्या चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन लॅपीड यांनी केले. इस्रायल आणि युएईमधील या सहकार्यासाठी परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे आभार मानले.

इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांचा युएईचा ऐतिहासिक दौरा - अबु धाबीमध्ये इस्रायलचा दूतावास सुरूनऊ महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि युएई व बाहरिन यांच्यात राजकीय सहकार्य प्रस्थापित झाले होते. या सहकार्याला गती देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान युएईच्या दौर्‍यावर येणार होते. पण गाझापट्टीतील हमासच्या हल्ल्यानंतर नेत्यान्याहू यांना युएईचा दौरा पुढे ढकलावा लागला होता. मंगळवारी परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी अबु धाबी येथील दूतावासाचे उद्घाटन करताना, इस्रायल व अरब देशांमधील या सहकार्यासाठी ट्रम्प आणि नेत्यान्याहू यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.

‘इस्रायलने युद्धापेक्षा शांततेला, संघर्षापेक्षा सहकार्याला तसेच भूतकाळातील आपल्या कटू आठवणींपेक्षा आपल्या मुलांच्या भविष्याला महत्त्व दिले, म्हणून इस्रायल व युएई आज येथे एकमेकांसह उभे आहेत’, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी केली. त्याचबरोबर ‘असे सहकार्याचे करार नेत्यांमध्ये झाले असले तरी जनतेने शांतता प्रस्थापित करायची असते’, असे आवाहन इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले.इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांचा युएईचा ऐतिहासिक दौरा - अबु धाबीमध्ये इस्रायलचा दूतावास सुरू

‘इस्रायलला आपल्या सर्व शेजारी देशांबरोबर शांतता हवी आहे. इस्रायली कुठेही जाणार नसून आखात हेच इस्रायलींचे घर आहे व इस्रायली येथेच राहणार आहेत. या क्षेत्रातील सर्व देशांनी हे मान्य करावे आणि इस्रायलबरोबर चर्चेसाठी पुढे यावे’, असे आवाहन परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी केले. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युएचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन झाएद अल नह्यान यांची भेट घेऊन चर्चा केली. युएईच्या दौर्‍यावर येण्याआधी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इटलीमध्ये बाहरिनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती.

दरम्यान, आखाती देशांच्या नेत्यांची भेट घेऊन इतर आखाती देशांना सहकार्याचे आवाहन करून इस्रायलमधील बेनेट सरकार इराणविरोधात भक्कम आघाडी तयार करीत असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

leave a reply