सौदी अरेबिया पेट्रोडॉलरकडून पेट्रोयुआनच्या दिशेने

पेट्रोयुआनरियाध/बीजिंग – पाच दशकाहून अधिक काळ आपल्या इंधनाची विक्री केवळ डॉलर्समध्येच करणारा सौदी अरेबिया आता चीनच्या युआन चलनात इंधनव्यवहार करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सौदीची चीनबरोबर सखोल चर्चा सुरू आहे. सौदी व चीनमधील ही चर्चा मार्गी लागली तर, आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकेच्या डॉलरला फार मोठा धक्का बसेल. कारण रशियासारख्या बलाढ्य देशावर निर्बंध टाकून अमेरिकेने डॉलर कमकुवत केल्याची टीका अर्थतज्ज्ञ करीत आहेत. अशा परिस्थितीत सौदी व इतर आखाती देशांनीही युआनमध्ये इंधनाचे व्यवहार सुरू केले, तर जागतिक अर्थकारणात फार मोठ्या उलथापालथी होऊन त्याने अमेरिकेचे महासत्तापदही धोक्यात येऊ शकेल.

सौदी अरेबिया दररोज एक कोटी बॅरल्सहून अधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करतो. त्यातील ७० लाख पेट्रोयुआनबॅरल्सहून अधिक कच्चे तेल निर्यात केले जाते. या निर्यातीतील सुमारे १८ लाख बॅरल्स कच्चे तेल चीन खरेदी करतो. सौदीच्या एकूण तेलनिर्यातीत चीनचा हिस्सा २५ टक्क्यांहून अधिक आहे. तर चीनला लागणार्‍या एकूण इंधनापैकी १६ टक्के इंधनाची गरज सौदी अरेबिया पूर्ण करतो. दोन देशांमधील वार्षिक व्यापार ५० अब्ज डॉलर्सहून अधिक असून त्यातील इंधनक्षेत्राचा वाटा सुमारे १० अब्ज डॉलर्सचा आहे.

या पार्श्‍वभूमीवर सौदीने चीनच्या युआन चलनात इंधनव्यवहारांचे संकेत देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. सौदी तसेच चीनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून या मुद्यावर चर्चा सुरू होती. मात्र सौदीचे अमेरिकेबरोबरील वाढते मतभेद आणि रशिया-युक्रेन युद्ध या घटनांनी ‘पेट्रोयुआन’संदर्भातील चर्चेला वेग मिळाला आहे. ही टप्पा जवळपास अंतिम टप्प्यात असल्याचे दावेही करण्यात येतात. सौदी व चीनदरम्यानच्या या चर्चेनंतर चीनच्या युआन चलनाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणी अचानक वाढली असून डॉलरच्या तुलनेत युआनचे मूल्य वाढल्याचे समोर आले आहे.

पेट्रोयुआनसौदी-चीनदरम्यानच्या या चर्चेच्या वृत्तावर अमेरिकेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘आमचे मित्रदेश तसेच भागीदार देशांचे चीनबरोबर स्वतंत्र पातळीवर संबंध आहेत. कोणत्याही देशांना आम्ही अमेरिका किंवा चीन यांची निवड करा, असे सांगितलेले नाही. प्रत्येकाला भागीदारी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी सांगितले. तर अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकारी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या प्रतिक्रियेत सौदी अरेबिया इंधन व्यवहारांमध्ये युआनचा वापर करु शकत नाही, ही बाब अशक्य आहे असे बजावले आहे. युआनमध्ये इंधनव्यवहार करणे हे सौदीने आपल्या अर्थव्यवस्थेत खंजीर खुपसण्यासारखे आहे, असा टोला वरिष्ठ अधिकार्‍याने लगावला आहे.

यापूर्वी रशियाने चीनबरोबरील इंधनव्यवहार युआनमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दोन्ही देशांकडून अमेरिकी डॉलरचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ओळखला जातो.

leave a reply