चाडमधील सोन्याच्या खाणीत झालेल्या हिंसाचारात 100 जणांचा बळी

सोन्याच्या खाणीत

जामेना – चाडमधील सोन्याच्या खाणीत झालेल्या हिंसाचारात 100हून अधिक जणांचा बळी गेला, तर 40हून अधिक जण जखमी झाले आहेत. लिबियाच्या सीमेला लागून असलेल्या चाडच्या कुडी बुगूदी भागात हे हत्याकांड घडले. चाडमधील विरोधी पक्ष आणि मानवाधिकार संघटनांनी ह्या नरसंहारासाठी चाडच्या सरकारलाच जबाबदार धरले आहे. दरम्यान, ह्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चाडच्या लष्कराने इथल्या खाणींचा ताबा घेतला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.

चाडच्या राजधानीपासून 600 मैल अंतरावरील कुडी बुगूदी प्रांतात तिबस्टी पर्वतरांगा आहेत. दहा वर्षांपूर्वी या डोंगराळ भागात सोन्याच्या खाणींचा शोध लागला. त्यानंतर चाड व शेजारील मारिशेनिया, लिबिया या देशातील जनता अवैधपणे इथे येऊ लागली. सोने उत्खननावरून या चाड व शेजारी देशांमधील नागरिकांमध्ये कायम संघर्ष होत असतो. गेल्या आठवड्यात मॉरिशेनियन आणि लिबियन्समध्ये झालेल्या वादावादीनंतर हा संघर्ष पेटला.

सोन्याच्या खाणीतपुढे याचे पर्यवसान हिंसाचारात झाले आणि यात अनेकजण दगावल्याची माहिती चाडचे प्रसारणमंत्री आब्देर्मन कोलाम्लाह यांनी दिली. या हल्ल्यात कितीजण ठार झाले याची आकडेवारी आब्देर्मन यांनी दिलेली नाही. इथली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर लष्कराने गोळीबार केला, या हल्ल्यात सुमारे 200 हून अधिक जण ठार झाले असा दावा मानावाधिकार संघटनेचे प्रमुख महम्मत नूर अबेदू यांनी केला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्ष आणि मानवाधिकार संघटनांनी या हिंसाचारासाठी चाडच्या सरकारला जबाबदार धरले आहे.

विरोधी पक्ष आणि मानवाधिकार संघटेनेने केलेले सर्व आरोप चाडचे संरक्षणमंत्री दाऊद याया ब्राहीम यांनी फेटाळले आहेत. या भागात लष्कराने गोळीबार केलेला नसून 200 जण दगावल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे ब्राहीम यांनी म्हटले आहे.

1960 साली चाड फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. या देशातील तिबेस्टी हा प्रदेश वांशिक संहारासाठी प्रसिद्ध आहे. तीन वर्षांपूर्वी कुडी बुगूदी प्रांतात याच कारणांवरून चाड आणि लिबियन्समध्ये झालेल्या संघर्षात अनेकांचा बळी गेला होता. या हिंसाचारानंतर चाडच्या लष्कराने हा परिसर ताब्यात घेतला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.

leave a reply