इराणच्या संवर्धित युरेनियमच्या साठ्यात 18 पट वाढ

- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची चिंता

व्हिएन्ना/तेहरान – 2015 साली झालेल्या अणुकरारानुसार इराणला 300 किलो वजनाचे संवर्धित युरेनियमचा साठा ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. पण 15 मे 2022 पर्यंत इराणने आपल्या अणुकार्यक्रमाअंतर्गत एकूण 3,809.3 किलो वजनाइतके संवर्धित युरेनियम जमा केल्याची चिंताजनक माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने प्रसिद्ध केली. इराणच्या संवर्धित युरेनियमच्या साठ्यात 18 पटीने झालेली ही वाढ 2015 सालच्या मूळ अणुकराराचे उल्लंघन असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. तर अणुऊर्जा आयोगाच्या अहवालानुसार इराणकडे अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक युरेनियमचा साठा असल्याची भीती हे विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

uranium-reserves2015 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेऊन इराणबरोबर अणुकरार केला होता. यानुसार इराणला आपल्या अणुकार्यक्रमातील संवर्धित युरेनियम आणि सेंट्रिफ्युजेसची संख्या मर्यादेखाली ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. या अटीवरच पाश्चिमात्य देशांनी इराणला निर्बंधातून सवलत तसेच इतर सहाय्य दिले होते. पण गेल्या सात वर्षांमध्ये इराणने मूळ अणुकराराचे पूर्ण उल्लंघन केल्याचे अणुऊर्जा आयोगाच्या नव्या अहवालातून समोर येत आहे.

अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी संवर्धित युरेनियमची मात्रा 90 टक्के इतकी आवश्यक असते. पण इराणने आपल्या अणुप्रकल्पांमधील संवर्धित युरेनियमची मात्रा 3.67 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवावी, असे ठरले होते. पण इराणच्या अणुप्रकल्पांची पाहणी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इराणने 20 टक्क्यांची मात्रा असलेले संवर्धित युरेनियमचा साठा 238.4 किलोपर्यंत नेला आहे. याशिवाय 60 टक्के मात्रा असलेल्या संवर्धित युरेनियमच्या साठ्यातही मोठी वाढ झाल्याचे अणुऊर्जा आयोग निदर्शनास आणून देत आहेत.

 iran nuclear dataत्याचबरोबर इराणने आपल्या अणुकार्यक्रमातील काही प्रश्नांबाबत समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची तक्रारही अणुऊर्जा आयोगाने दिली. मारिवान, वारामिन आणि तुर्कूझाबाद येथील प्रकल्पांमधील अघोषित आण्विक साठ्यांबाबत इराणने कुठलाही खुलासा केला नसल्याचे अणुऊर्जा आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे इराण आपल्या अणुकार्यक्रमाबाबत लपवाछपवी करीत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप अणुऊर्जा आयोग करीतअसल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहे.

दरम्यान, 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन करून इराणने अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक युरेनियमचा साठा मिळविल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीतआहेत. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी देखील काही दिवसांपूर्वीच इराण अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक साहित्य मिळविण्याच्या जवळ येऊन पोहोचल्याचा इशारा दिला होता. इराण अण्वस्त्रसज्ज झाला तर सौदी अरेबिया देखील शांत बसणार नसल्याचे अमेरिकी विश्लेषकांनीच बजावले होते.

leave a reply