तैवान-चीनमध्ये नवा तणाव

- तैवानमधील चिनी सेमीकंडक्टर कंपन्यांवर धाडी

तैवान-चीनतैपेई – चीनच्या लष्कराने तैवानवर हल्ल्याची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत. पण त्याच्या आधीच पण चीन आणि तैवानमध्ये सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात संघर्ष भडकल्याचे दिसत आहे. तैवानच्या यंत्रणांनी चीनच्या 10 कंपन्यांवर धाडी टाकून 70 हून अधिक जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. चिनी सेमीकंडक्टर कंपन्या तैवानमधील इंजिनिअर्स, कुशल मनुष्यबळ आपल्याकडे खेचण्याचा अवैध प्रयत्न करीत असल्याचा ठपका तैवानने ठेवला आहे. गेल्या तीन महिन्यात तैवानने चिनी कंपन्यांवर केलेली ही दुसरी कारवाई ठरते. ‘इंटिग्रेटेड सर्किट्स’ किंवा ‘मायक्रोचिप’ या नावानेही ओळखण्यात येणाऱ्या सेमीकंडक्टर्सना आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा ‘ब्रेन’ म्हणून ओळखले जाते. स्मार्टफोनपासून ते अंतराळात पाठविण्यात येणाऱ्या उपग्रहापर्यंत सर्व क्षेत्रात सेमीकंडक्टर्सच्या वेगवेगळ्या प्रकारांचा वापर होतो. कमी खर्चात सेमीकंडक्टरचे उत्पादन करणाऱ्या तैवानच्या कंपन्यांना जगभरात मोठी मागणी आहे.

कोरोनाच्या काळात ‘सप्लाय चेन क्रायसिस’ अर्थात जागतिक पुरवठा साखळीतील समस्या निर्माण झाली. चीनवरील विश्वास गमावलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपली गुंतवणूक मागे घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पुकारलेल्या व्यापार युद्धांतर्गत तैवानला हाताशी धरून सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचा चीनला होणारा पुरवठा रोखला होता. यानंतर अजूनही तैवानमधून चीनला हा पुरवठा सुरळीत झालेला नाही.

तैवान-चीनअमेरिका व चीनमधील या भूराजकीय तणावामुळे चीनच्या सेमीकंडक्टर निर्मिती कंपन्यांना मोठा हादरा बसला आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने तैवानमधील सेमीकंडक्टर क्षेत्रातील इंजिनिअर्स तसेच कुशल मनुष्यबळ आपल्याकडे खेचण्यास सुरूवात केल्याचा आरोप तैवानच्या कामगार मंत्रालयाने केला आहे. तैवानमध्ये प्रस्थापित झालेल्या चिनी सेमीकंडक्टर कंपन्या या गुन्ह्यात सहभागी असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांच्या सरकारने ठेवला आहे.

या पार्श्वभूमीवर, गेल्या चोवीस तासांमध्ये तैवानमधील यंत्रणांनी राजधानी तैपेईसह शिंचू, तायुआन या शहरांमधील चिनी कंपन्यांवर धाडी टाकल्या. सेमीकंडक्टर इंजिनिअर्स आणि संबंधित कामगारांना बेकायदेशीररित्या चीनमध्ये नेण्याच्या आरोपाखाली चिनी कंपन्यांमधील 70 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. ‘सिंगापूर पोस्ट’ या दैनिकाने ही बातमी प्रसिद्ध केली. यामुळे चीन आणि तैवानमधील तणावात भर पडल्याचे या दैनिकाने म्हटले आहे.

गेल्या तीन महिन्यांमध्ये तैवानच्या त्साई सरकारने चिनी कंपन्यांवर केलेली ही दुसरी कारवाई ठरते. याआधी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीची ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी-टीएसएमसी’ने केलेल्या चौकशीमध्ये आठ चिनी कंपन्या स्थानिक इंजिनिअर्सना प्रलोभन दाखवून आपल्याकडे वळवित असल्याचे उघड झाले. तैवानी इंजिनिअर्स आणि कामगारांना अडीचपट पगाराचे आमिष दाखवून चीन तैवानच्या बुद्धीसंपदेची चोरी करीतअसल्याची टीका त्यावेळी झाली होती. तैवानच्या कायद्यानुसार हा गुन्हा ठरतो. पण चीनने तैवानचे हे आरोप फेटाळले आहेत.

अमेरिकन संशोधक तसेच शास्त्रज्ञांना आपल्यासाठी काम करण्यास भाग पाडून चीन अमेरिकन बुद्धिसंपदेची चोरी करीत असल्याचा आरोप अमेरिकेनेही केला होता.

leave a reply