भारतावर दडपण टाकण्यासाठी चीनची धडपड

नवी दिल्ली – चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारताने केलेला नाही पण, दोन्ही देशांमध्ये या संदर्भात झालेल्या करारांचा भंग करुन चीन इथली स्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला फटकारले. लडाखच्या गलवान व्हॅलीतून चीन माघार घेतल्यासारखे दाखवत असला तरी, देप्सोंग भागात चीन मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती करीत असल्याचे उघड झाले आहे. इतकेच नाही तर हिंदी महासागर क्षेत्रात सुमारे पाचशे चिनी मच्छिमार जहाजांचे पथक वावरत आहेत. चीनची ही मच्छिमार जहाजे म्हणजे, चिनी नौदलाचेच पथक असल्याचे आरोप याआधी आग्नेय आशियाई देशांनी केले होते.

गलवान व्हॅलीसह सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेत सैन्यमाघारी घेण्याचे मान्य केल्यानंतरही चीन देप्सोंग क्षेत्रात प्रचंड प्रमाणात तैनाती करीत आहे. भारताच्या ‘दौलत बेग ओल्डी’ हवाईतळाजवळ चीन करीत असलेली तैनाती या क्षेत्रातील भारतीय लष्कराची गस्त रोखण्यासाठीच असल्याचे दावे वृत्तवाहिन्या करीत आहेत. त्यामुळे सीमेवरचा तणाव कमी करण्यात चीनला अजिबात स्वारस्य नसल्याचे उघड होत आहे.

१५ जूनच्या मध्यरात्री गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारतीय लष्कराच्या वीस जवानांनी बलिदान दिले. त्याचवेळी या संघर्षात चीनला भारताच्या दुपटीहून अधिक जवान गमवावे लागले. या संघर्षात जबर जखमी झालेल्या चिनी जवानांची संख्या भारतीय जखमी जवानांपेक्षाही कितीतरी मोठी आहे. या संघर्षात भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाची दखल घेऊन लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी या सैनिकांचा सन्मान केला. तर दुसऱ्या बाजूला स्वतःला महासत्ता म्हणविणाऱ्या चीनच्या लष्कराची या संघर्षात मानहानी झाली आहे.

म्हणूनच भारताला धक्का देऊन मगच इथल्या सीमेवरुन माघार घेण्याचा धोरणात्मक निर्णय चीनने घेतला असावा, अशी दाट शक्यता समोर येत आहे. पण भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे चीनला तशी संधी साधता आलेली नाही. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर भारतीय लष्कर व वायुसेना युद्धसज्ज आहे. हिंदी महासागर क्षेत्रातही चीन भारताला आव्हान देऊ शकतो, याची जाणीव असलेल्या भारताच्या नौदलानेही याची जय्यत तयारी केलेली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात सुमारे ५०० चिनी मच्छिमार जहाजे वावरत असल्याची माहिती भारताच्या मच्छिमार संघटनांनी दिली आहे. याआधी चीन साऊथ चायना सी क्षेत्रात मोठ्या संख्येने आपली मच्छिमार जहाजे घुसवून आपले वर्चस्व गाजवित असल्याचे समोर आले होते. ही सर्वसाधारण मच्छिमार जहाजे नसून तो चिनी नौदलाच्या आक्रमक योजनेचा भाग असल्याचा आरोप आग्नेय आशियाई देशांनी केला होता. त्यामुळे चीनच्या मच्छीमार जहाजांकडे चीनच्या नौदलाचे पथक म्हणूनच पाहिले जाते.

अशारितीने चीन भारतावर दडपण टाकण्याच्या वेगवेगळ्या पर्यायांवर काम करीत आहे. हे करीत असताना चीन आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपली प्रतिमा अधिकाधिक बिघडवित चालला असून भारताला जगभरातून मिळणारे समर्थन वाढत चालले आहे. चीनच्या विरोधात खड्या ठाकलेल्या देशांची आघाडी चीनला अधिकच अस्वस्थ करीत आहे. यामुळे आक्रमणही करता येत नाही व माघारही घेता येत नाही, अशा विचित्र स्थितीत चीन अडकला आहे. म्हणूनच भारतासह आपल्या इतर प्रतिस्पर्धी देशांवर दडपण वाढविण्याचा प्रयत्न चीन करीत आहे.

leave a reply