केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढीस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाअंतर्गत महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर जाणार आहे. या निर्णयाचा लाभ 52 लाख कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना मिळेल.

महागाई भत्त्यात

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून याबाबतची मागणी होत होती. मात्र सरकारने कोरोनाच्या संकटामुळे महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली होती.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली होती. तर जुलै महिन्यात तीन टक्के वाढ करण्यात आली होती. ही सर्व थकीत रक्कम देखील देण्यात येणार आहे. महागाई भत्त्यासंदर्भात जुलै महिन्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे सर्व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले होते. अखेर सरकारने महागाई भत्त्यात वाढ करत केंद्रीय कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे.

1 जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे. याशिवाय महागाई भत्त्याचे थकलेले तीन हप्ते देखील कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार एखाद्या कर्मचार्‍यांचे वेतन 20 हजार रुपये असल्यास 11 टक्के महागाई भत्ता वाढीनुसार त्याच्या वेतनात 2200 रुपयांची वाढ होईल.

केंद्रीय कर्मचार्‍यांना वर्षातून दोनवेळा (जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर) या कालावधीत महागाई भत्ता देण्यात येतो. महागाईच्या दरावरून केंद्र सरकार महागाई भत्ता ठरवते. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात थेट 11 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

leave a reply