इराणमध्ये अस्थैर्य माजवू पाहणाऱ्या अमेरिकेला प्रत्युत्तर मिळेल

- इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

प्रत्युत्तर मिळेलतेहरान/दुबई – ‘आपल्यासाठी इराणबरोबरचा अणुकरार अतिशय महत्त्वाचा ठरतो, असा संदेश अमेरिका राजनैतिक पातळीवर देत आहे खरी. पण इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला पाठिंबा देऊन अमेरिका अगदी याच्या विरोधात भूमिका घेत आहे. हा प्रकार इराण अस्थीर करण्याच्या प्रयत्नांचा भाग ठरतो. याआधीही अमेरिकेने असे प्रयत्न करून पाहिले होते आणि त्यात त्यांना अपयश आले होते. यावेळी अमेरिकेच्या कारस्थानांना इराणकडून जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल’, असा इशारा इराणचे पररष्ट्रमंत्री हुसेन आमिरअब्दोल्लाहियान यांनी दिला.

कुर्दवंशिय तरुणी माहसा अमिनी हिचा इराणच्या तुरुंगात मृत्यू झाला. इराणमधील हिजाब सक्तीच्याविरोधात लढा देणाऱ्या माहसाची हत्या झाल्याचा आरोप करून गेले नऊ दिवस इराणमध्ये हिंसक निदर्शने भडकली आहेत. निदर्शकांनी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानांवर हल्ले चढविल्याचे प्रकार उघड झाले आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. तर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले इराणच्या लष्कराचे हिरो कासेम सुलेमानी यांचे पोस्टर्स देखील आंदोलकांनी फाडल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रत्युत्तर मिळेलइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी या आंदोलकांना ‘दंगलखोर’ जाहीर केले. तसेच या हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी दिला होता. पण सदर आंदोलन इराणच्या राजवटीसमोरी आव्हानात भर घालत आहेत. यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत असून ब्रिटन आणि नॉर्वेने आंदोलकांचे समर्थन केले. यामुळे खवळलेल्या इराणने या दोन्ही युरोपिय देशांच्या राजदूतांना समन्स बजावले आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी देखील इराणमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला अणुकराराच्या वाटाघाटींशी जोडले.

‘इराण अण्वस्त्रसज्ज होऊ नये, यासाठी अमेरिकेने राजनैतिक वाटाघाटींना महत्त्व देत आहे. असे असले तरी इराण आपल्या देशातील महिलांवर करीत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करण्यापासून अमेरिकेला कुणीही रोखू शकत नाही’, असे सुलिवन यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्याचबरोबर माहसा अमिनीवर कारवाई करणाऱ्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवरील टाकलेल्या निर्बंधांची आठवण सुलिवन यांनी करुन दिली. तर इराणच्या राजवटीविरोधातील आंदोलन जगभरात पोहोचविण्यासाठी या देशातील इंटरनेटवरील निर्बंध काढल्याचे सुलिवन म्हणाले.

यानंतर इराणने अमेरिकेवर जोरदार ताशेरे ओढले. ‘शांततापूर्ण निदर्शने हा प्रत्येक देशातील नागरिकाचा अधिकार आहे. पण दंगलखोरांना समर्थन देऊन अमेरिका अणुकराराबाबत राजनैतिक स्तरावर देत असलेल्या संदेशाच्या अगदी विरोधात भूमिका घेत आहे’, असा आरोप इराणचे परराष्ट्रमंत्री आमिरअब्दोल्लाहियान यांनी केला. ‘अमेरिकेचे हे प्रयत्न इराणला अस्थीर करणारे असून याआधीही अशाप्रकारचे अपयशी प्रयत्न अमेरिकेने केले होते. पण यावेळी इराण अस्थिर करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल’, असा इशाराच इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

leave a reply