इराणमध्ये चोवीस तासात कोरोना व्हायरसचे १४४ बळी

तेहरान – गेल्या २४ तासात कोरोनाव्हायरसमुळे इराणमध्ये १४४ जण दगावले आहेत. या साथीने आतापर्यंत इराणमध्ये २३००हून अधिक जणांचा जीव गेला आहे. तर या साथीचे एका दिवसात २९२७ नवे रूग्ण आढळले आहेत. इतर आखाती देशांमध्येही या साथीने प्रवेश केला असून इराकमध्ये साथीच्या ३१ रूग्णांचा बळी गेला आहे. तर आखाती देशांमध्ये बळींची संख्या नऊवर गेली आहे. दरम्यान, इराणमध्ये ही साथ थैमान घाालत असली तरी आपला देश अमेरिकेचे सहाय्य घेणार नाही असे इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

महिन्याभरापूर्वी इराणमध्ये कोरोनाव्हायरसने शिरकाव केल्यानंतर या साथीचे २३७८ बळी गेले आहेत. शुक्रवारी इराणमध्ये १४४ जणांचा बळी गेल्यानंतर सरकारने ही साथ रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र इराणमध्ये अंतर्गत प्रवासावर याआधीच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इराणच्या सरकारच्या नव्या उपाययोजना ही साथ रोखण्यासाठी कितपत प्रभावी ठरतील, यावर शंका उपस्थित केली जाते.

या साथीचा सामना करण्यासाठी इराणकडे पुरेशा आरोग्य विषयक सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे इराणमधील अवस्था भयंकर बनली असून अमेरिकेच्या निर्बंधांमुळे या साथीचा मुकाबला करताना आपल्या सरकारसमोर खूप मोठी आव्हाने उभी ठाकत असल्याचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते. अमेरिकेने हे निर्बंध मागे घ्यावे यासाठी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी आवाहनदेखील केले होते. मात्र याच काळात अमेरिकेने इराणवर नवे निर्बंध लादून ही मागणी धुडकावली होती. यापार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉप्सचे (आयआरजीसी) चिफ कमांडर मेजर जनरल हुसैन सालामी यांनी अमेरिकेच्या विरोधात आक्रमक सूर लावला आहे. ही साथ रोखण्यासाठी इराण अमेरिकेचे सहाय्य घेणार नाही, असे मेजर जनरल सालामी यांनी म्हटले आहे. अमेरिकेन यंत्रणा आपल्या जनतेला कोरोना व्हायरसपासून वाचविण्यात अपयशी ठरली असून उलट अमेरिकेला ह वी असेल तर इराण अमेरिकेला सहाय्य करायला तयार असल्याचे मेजर जनरल सालामी यांनी म्हटले आहे.

leave a reply