देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ८०० वर पोहोचली

नवी दिल्ली/मुंबई – कोरोनाव्हायरसमुळे बळीची संख्या १७ झाली असून लागण झालेल्यांची संख्या ८०० वर पोहोचली आहे. शुक्रवारी एका दिवसात १०० रुग्ण आढळून आले. आतापर्यंत देशात एका दिवसात नोंदविण्यात आलेली ही कोरोनाव्हायरसची सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे. यामध्ये केरळ आणि महाराष्ट्रात या साथीच्या रुग्णाची संख्या सर्वाधिक आहे. केरळमध्ये आतापर्यंत १७६ कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळले आहेत, तर महाराष्ट्रात १५६ प्रकरणे समोर आली आहेत. राज्यातील सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कोरोनाव्हायरसचे १२ नवे रुग्ण आढळले. येथे एकाच कुटुंबातील २३ जणांना या साथीची लागण झाल्याने खळबळ माजली आहे.

शुक्रवारी देशात कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या चारने वाढली. कोरोनाव्हायरस फैलावू नये, या महामारीवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी सरकारने लॉकडाऊनसह इतर उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरीसुद्धा काही जण नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर येत आहेत व गर्दी करीत आहेत. तसेच वेगळे राहण्यास सांगण्यात आलेल्या संशयित रुग्णांकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केला जात असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. परदेशातून परतलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याने इतरांपासून वेगळे राहण्याचा नियम मोडून केरळातून कानपूरपर्यंतचा प्रवास केला, तर या साथीची लागण झालेल्या एका व्यक्तीने नियम मोडून मुंबईतील सैफी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरची भेट घेतली होती. यामुळे या डॉक्टरसहित त्यांच्या कुटुंबियांना या साथीची लागण झाली. या वरिष्ठ डॉक्टरचे शुक्रवारी दुर्देवी निधन झाले. अशा निष्काळजीपणामुळे या साथीचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे.

देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांची संख्या ८०० च्या पुढे गेली आहे. केरळात एका दिवसात ३९ नवे रुग्ण आढळूले, तर महाराष्ट्रात २८ नव्या रुग्णांची नोंद झाली एका दिवसात देशात १०० नवे रुग्ण सापडले. याच्या एक दिवसआधी ८० नवे रुग्ण आढळून आले होते.

महाराष्ट्रात सांगलीच्या इस्लामपूरमध्ये १५ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हे सर्वजण याआधी येथे सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आले होते. यातील १२ जण एकाच कुटुंबातील आहेत, तर आतापर्यंत याच कुटुंबातील एकूण २३ जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर हा भाग सील करण्यात आला आहे. शुक्रवारी नागपूरमधल्या ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुंबई आणि ठाण्यात आणखी दोन रुग्ण आढळून आले.

आतापर्यंत राजस्थानात ४५, पंजाबमध्ये ३८ रुग्ण आढळून आले आहेत. पंजाबमध्ये केवळ एका व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना कोरोना झाला आहे. या व्यक्ती गेल्या आठवड्यात या आजाराने दगावला.

दरम्यान एका व्यक्तीने जरी लॉकडाऊन व इतर सूचनांचे पालन केले नाही, सदर सरकारचे सर्व प्रयत्न मातीमोल होतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना १० हजार व्हेंटीलेटरचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे.

तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला (बीईएल) ३० हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

leave a reply