कोरोनाव्हायरसचे बळी आणि रुग्णांची संख्या वाढल्याने अमेरिका तणावाखाली

वॉशिंगटन – गेल्या चोवीस तासात अमेरिकेत कोरोनाव्हायरसने २६८ जणांचे बळी घेतले आहेत. तर एका दिवसात अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या १७ हजारांनी वाढून ८५,७४९ वर पोहोचली आहे. याबरोबर अमेरिका या साथीचे सर्वाधिक रूग्ण असलेला देश ठरला आहे. तर अमेरिका या साथीबाबत पारदर्शकता बाळगत असून, चीनप्रमाणे रुग्णांची संख्या दडवीत नाही, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

जगभरातील कोरोनाव्हायरसच्या साथीवर नजर ठेवून असणार्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतरा हजाराहून अधिक जणांची वाढ झाली. आठवड्याभरापूर्वी अमेरिकेत या विषाणूचे आठ हजार रूग्ण होते. पण गेल्या आठवड्याभरात या रुग्णांची संख्या दसपटीने वाढली आहे. यामुळे जुलै महिन्यापर्यंत अमेरिकेसाठी अत्यंत खडतर काळ असल्याचे दावे तज्ञ करीत आहेत.

आतापर्यंत या साथीने १,३०४ जणांचा बळी घेतला आहे. किमान दोन हजार रूग्ण अत्याव्यस्थ आहेत. अमेरिकेत कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढत असताना, ही साथ रोखण्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पूर्णपणे अपयशी ठरले, अशी टीका सुरू झाली आहे. याला उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत व यामुळे रुग्णांची खरी संख्या जगासमोर येत आहे, असा खुलासा केला. पण दुसर्या बाजुला, चीनसारख्या देशांमधली परिस्थिती जगासमोर येऊ दिली जात नाही, याकडेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लक्ष वेधले. गेल्या काही दिवसांपासून चीन आपण या साथीवर विजय मिळविल्याचे दावे करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे उत्तर दिल्याचे दिसते.

दरम्यान, अमेरिकेच्या न्याय विभागाने कोरोनाव्हायरसबाबत दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची घोषणा केली. अमेरिकेतील कोणतीही व्यक्ती हेतुपुरस्सर या साथीचा फैलाव करताना आढळल्यास त्यावर दहशतवादविरोधी गुन्ह्यांतर्गत कारवाई केली जाईल, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने स्पष्ट केले.

leave a reply