भारत आणि इटलीमध्ये १५ करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली – शुक्रवारी भारत आणि इटलीमध्ये व्हर्च्युअल समिट पार पडली. यावेळी उभय देशांमध्ये व्यापार, ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सीएनजी, शिपिंग व मत्स्यक्षेत्रासह १५ करार झाले. तसेच व्हर्च्युअल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसिपे कॉन्टे यांच्यात कोरोनाव्हायरस आणि इतर द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा झाली.

१५ करार

शुक्रवारच्या भारत आणि इटलीच्या पाचव्या व्हर्च्युअल समिटमध्ये कोरोनाव्हायरसचे संकट आणि त्यानंतरचे जग यावर प्रामुख्याने चर्चा झाली. इटलीत वेगाने कोरोनाव्हायरसची साथ पसरली होती. आताही या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि इटलीचे कोरोनाच्या विरोधातील सहकार्य महत्त्वाचे ठरते. इतिहासात दुसऱ्या महायुद्धाप्रमाणेच कोरोनाव्हायरसची देखील नोंद केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कोरोनानंतरचे जग स्वीकारुन संधी आणि आव्हानांसाठी तयार रहायला हवे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘सप्लाय चेन’ अर्थात पुरवठा साखळी यावर या समिटमध्ये भर देण्यात आला. आतापर्यंत ग्लोबल सप्लाय चेनमध्ये चीनचे वर्चस्व होते. पण कोरोनाव्हायरसच्या संकटानंतर सारे जग चीनच्या विरोधात गेले. या समिटदरम्यान इटलीने सप्लाय चेन आणि भारतात गुंतवणूक वाढविण्यासाठी उत्सुकता दाखविली. या सप्लाय चेनमध्ये द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला विशेष महत्त्व आहे, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

तसेच भारत आणि इटलीने संरक्षण सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली. यावेळी दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा निषेध करुन त्याविरोधात सहकार्य दृढ करण्याचे ठरविले. गेल्या काही दिवसात युरोपात दहशतवाद्यांनी डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि इटलीच्या नेतृत्वामध्ये झालेली दहशतवादविरोधी सहकार्यावर झालेली चर्चा महत्वाची ठरते. दरम्यान,पुढील वर्षी इटली ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन करणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ साली भारतात ‘जी-२०’ परिषद पार पडणार आहे. शनिवारी पार पडलेल्या व्हर्चुअल समिटदरम्यान ‘जी -२०’च्या आयोजनावरही चर्चा पार पडली.

leave a reply