भारत-नेपाळमधील वाद चर्चेतून सुटतील

- नेपाळच्या पंतप्रधानांचा विश्वास

नवी दिल्ली/ काठमांडू – लष्करप्रमुख जनरल मनोज मुकंद नरवणे यांच्या नेपाळ दौऱ्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे सूर बदलले आहेत. शुक्रवारी लष्करप्रमुख नरवणे यांनी नेपाळचे पंतप्रधान ओली यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘भारत आणि नेपाळचे संबंध फार जुने आणि विशेष आहेत. भारत नेपाळचा चांगला मित्र असून दोन्ही देश कोणतीही समस्या आपापसात चर्चेने सोडवू शकतात”, असा विश्वास यावेळी नेपाळच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला. नेपाळने राजकीय नकाशा प्रसिद्ध करून भारतीय भूभागावर दावा केल्यावर दोन्ही देशांमधील वाद वाढला होता. त्यानंतर भारत-नेपाळमध्ये पार पडलेली पहिली उच्चस्तरीय चर्चा आहे.

वाद

गेल्या काही महिन्यात भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले होते. नेपाळने भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भूभागावर दावासांगून या भागांचा समावेश असलेला नवा नकाशा प्रसिद्ध केला होता. भारताने यानंतर आक्षेप नोंदविताना चर्चा हवी असेल, तर नेपाळलाच आता वातावरण निर्मिती करावी लागेल, असे ठणकावून संगितले होते. मात्र त्यानंतरही भारताच्या हिताला धक्का देतील असे आणखी काही निर्णय नेपाळने घेतले होते. यामागे नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारवरील चीनचा प्रभाव असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे होते. मात्र चीनने नेपाळची जमीन बळकावल्याचे उघड झाल्यावर गेल्या काही दिवसात नेपाळने भारताबरोबर संबंध सामान्य करण्यासाठी संकेत देणारे काही निर्णय घेतले होते.

या पार्श्वभूमीवर नेपाळने भारताच्या लष्करप्रमुखांना मानद जनरल पद देण्याचा निर्णय घेतला होता. भारताचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी आपल्या तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यात नेपाळच्या लष्करप्रमुखांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तर शुक्रवारी जनरल नरवणे यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांच्याशी चर्चा केली. यावेळी नेपाळच्या पंतप्रधानांनी भारत आणि नेपाळमध्ये असलेल्या जुन्या संबंधांचे दाखले दिले आणि दोन्ही देश चांगले मित्र असल्याचे पंतप्रधान ओली म्हणाले. तसेच दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सुटतील, असा विश्वास व्यक्त केला. भारताचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या या दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये सचिवस्तरीय चर्चा पुन्हा सुरु होऊ शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply