अमेरिकेने ‘ईटीआयएम’ला दहशतवादी यादीतून वगळल्याने चीनचा थयथयाट

‘ईटीआयएम’वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेने ‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ला (ईटीआयएम) दहशतवादी संघटनांच्या यादीतून काढून टाकले आहे. ‘ईटीआयएम’ ही संघटना अस्तित्वात असल्याचे ठोस पुरावे सापडले नसल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकेने दिली. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने संताप व्यक्त केला असून दहशतवादी संघटनांबाबत अमेरिका दुटप्पी भूमिका स्वीकारीत असल्याची टीका चीनने केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निर्णयामुळे झिंजियांग प्रांतात उघूरांविरोधात चीनची सुरू असलेली कारवाई यापुढे तीव्र टीकेचे लक्ष्य ठरू शकते. म्हणूनच अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन बिथरल्याचे दिसत आहे.

‘ईटीआयएम’अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाम्पिओ यांनी दोन दिवसांपूर्वी ‘ईटीआयएम’ला दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळल्याची घोषणा केली. ‘‘गेल्या दशकभरात चीन दावा करीत असलेली ‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’ (ईटीआयएम) ही दहशतवादी संघटना अस्तित्वात असल्याचे कुठलेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे ‘ईटीआयएम’ला दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्यात येत आहे”, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले. २००२ साली अमेरिकेने ‘ईटीआयएम’ला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले होते. अमेरिकेने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनचे समर्थन मिळविण्यासाठी ‘ईटीआयएम’वर ही कारवाई केली होती. पण गेल्या कित्येक वर्षात चीनने या संघटनेविरोधात ठोस पुरावे सादर केले नसल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे अमेरिकेने ‘ईटीआयएम’ला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळले आहे.

‘ईटीआयएम’अमेरिकास्थित उघूर संघटनेने अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले. गेल्या कित्येक वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित होता व या निर्णयामुळे चीनचे आरोप धुळीला मिळाल्याचे उघूरांच्या संघटनेने म्हटले आहे. तर अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने कमालीचा संताप व्यक्त केला आहे. ‘‘‘ईटीआयएम’ ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असून या संघटनेपासून चीन तसेच जगाला देखील धोका आहे. अशा या दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिकेने दुटप्पी भूमिका स्वीकारू नये. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सहकार्यावर माघार घेणे थांबवावे”, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. तसेच अमेरिका दहशतवादी संघटनेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करीत असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी केला.

‘ईटीआयएम’ ही संघटना चीनच्या झिंजियांग प्रांतात दहशतवाद पसरवित असल्याचा आरोप चीन करीत आहे. ही संघटना ईस्ट तुर्कस्तानच्या निर्मितीसाठी प्रयत्‍न करीत असल्याचा आरोप करुन चीनने झिंजियांग प्रांतातील उघूर तसेच तुर्क भाषिकांवर कारवाई केल्याची टीका मानवाधिकार संघटना करीत आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने झिंजियांग प्रांतात उभारलेल्या छळवणूक छावण्या त्याचे उदाहरण असल्याचा दावा केला जातो. म्हणून अमेरिकेने या संघटनेला ‘टेरर लिस्ट’मधून वगळून चीनला मोठा धक्का दिल्याचा दावा मानवाधिकार संघटना करीत आहेत.

दहशतवादाच्या बाबतीत अमेरिका दुटप्पी धोरण स्वीकारीत असल्याचे आरोप करीत असलेल्या चीनचीच दहशतवादाबाबतची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. भारतात दहशतवादी हल्ले घडवून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडणार्‍या जमात-उल-दावा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांना आजवर चीननेच संरक्षण पुरविले होते. तांत्रिक कारणे पुढे करुन चीनने या दहशतवादी संघटनांवरील सुरक्षा परिषदेच्या कारवाईला विरोध केला होता. भारताने आवाहन केल्यानंतरही चीनने आपल्याकडे असलेल्या नकाराधिकाराचा गैरवापर सुरू ठेवून भारताच्या सुरक्षेला धक्के देणारे निर्णय घेतले होते.

leave a reply