चोवीस तासात देशात ओमिक्रॉनचे १५६ नवे रुग्ण नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत राज्यांना केंद्रीय गृहखात्याचे निर्देश

नवी दिल्ली/मुंबई – देशात चोवीस तासात ओमिक्रॉन या कारोनाच्या नव्या व्हेरिअंटचे १५६ रुग्ण वाढले. तसेच सोमवारी आणखी रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ६०० च्या पुढे पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांनी सुरू करावी. कोरोना प्रतिबंधक उपायांच्या अंमलबजावणीत कोणताही हजगर्जीपणा करू नका, शिथिलता आणू नका, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहसचिव राजीव भल्ला यांनी दिले आहेत. यासंदर्भात सर्व सरकारांना पत्र लिहण्यात आली आहेत.

चोवीस तासात देशात ओमिक्रॉनचे १५६ नवे रुग्ण नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत राज्यांना केंद्रीय गृहखात्याचे निर्देशदेशात सध्या तरी दरदिवशी आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या सहा ते सात हजारांमध्ये स्थिर आहे. पण काही ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आले आहे. त्याचवेळी ११६ हून अधिक देशात पोहोचलेल्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या भारतात वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरुन चिंता वाढल्या आहेत. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कितीतरी पट वेगाने संक्रमण पसरविण्यास सक्षम असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या चोवीस तासात १५६ने वाढल्यावर चिंता वाढल्या आहेत.

सोमवारी सकाळपर्यंत देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ५७८ वर पोहोचली होती. तर सोमवारी दिवसभरातही विविध राज्यातून ओमिक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोेंद झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामुळे देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ६०० च्या पुढे पोहोचली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये पहिला ओमिक्रॉन रुग्ण आढळला आहे. सोमवारी मणीपूरमध्ये एका रुग्णाला ओमिक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले. हिमाचल प्रदेशातही ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. तेलंगणात १२ नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळले. गुजरातमध्ये ओमिक्रॉनचे २४ नवे रुग्ण सापडले.

रविवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ३१ रुग्ण आढळले होते. तर सोमवारी आणखी २६ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली. यातील ११ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. तसेच रायगडात पाच, ठाण्यात चार, नांदेडमध्ये दोन, पुणे, नागपूर, पालघर, भिवंडीमध्ये एक-एक रुग्ण आढळला आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत आतापर्यंत १४२ ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयानेही राज्यांना निर्देश दिले. २१ डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ज्या गाईडलाईन्स राज्यांना पत्र लिहून जारी केल्या होत्या. त्याची काटेकोर अंमलबजावणी ३१ डिसेंबरपूर्वी सुरू करावी. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचना व कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करताना कोणतीही ढिलाई बाळगू नका, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेशन आणि प्रतिबंधक नियमांचे पालन या पाच सूत्रांवर लक्ष पुरवा, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना पत्र लिहून सांगितले आहे. देशात ओमिक्रॉन १९ राज्यांपर्यंत पोहोचला आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. असे असताना हलगर्जीपणा करून चालणार नाही, असे भल्ला यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोमवारी केंद्र सरकारने १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाकरीता, तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर्स आणि व्याधीग्रस्त जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबतही मार्गदर्शक नियम जारी केले आहेत.

leave a reply