इराणचा इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पावर हल्ल्यासाठी सराव

दिमोनातेहरान – इराणवर हल्ल्याचा विचार केला तर इस्रायलचे हात छाटून टाकण्याचा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिला होता. इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पावर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्याचा सराव आयोजित करून इराणने आपला इशारा प्रत्यक्षात उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. सोमवारपासून व्हिएन्ना येथील अणुकराराबाबतची चर्चा नव्याने सुरू होत आहे. त्याआधी इराणने या सरावाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून इस्रायलला चिथावणी दिली.

गेल्या आठवड्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने पाच दिवसांच्या सरावाचे आयोजन केले होते. यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी लघू पल्ल्यासह दिर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. त्याचबरोबर रॉकेट लॉंचर्स, रणगाडे यांचा सरावही घेतल्याचे इराणच्या लष्कराने फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. या सरावाच्या निमित्ताने रिव्होल्युशनरी गार्ड्सने टेहळणी तसेच हल्लेखोर आणि आत्घाती ड्रोन्सची देखील चाचणी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

याच सरावाच्या निमित्ताने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल हुसेन सलामी आणि लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांनी इस्रायलला धमकावले होते. हा सराव आणि प्रत्यक्ष लष्करी कारवाई यांच्यात फारसा फरक नसल्याचे सांगून क्षेपणास्त्रांची दिशा बदलली तर ती इस्रायलवर कोसळतील, असा इशारा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी दिला होता.

दिमोनायाला दोन दिवस देखील उलटत नाही तोच, इराणच्या लष्कराशी संलग्न असलेल्या वृत्तवाहिन्यांनी सदर सरावाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये इराणची १६ क्षेपणास्त्रे एकामागोमाग एक अणुप्रकल्पावर कोसळत असल्याचे दाखविले आहे. या प्रकल्पातील अणुभट्टी आणि वेंटिलेशन शाफ्ट यांना इराणच्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. त्यामागोमाग इराणचे पाच आत्मघाती ड्रोन्स देखील सदर अणुप्रकल्पावर कोसळून या हल्ल्याची भीषणता वाढवित असल्याचे या व्हिडिओत दाखविले आहे.

यामध्ये सदर प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण इस्रायलचा दिमोना अर्थात ‘शिमॉन पेरेस नेगेव्ह’ अणुप्रकल्प आमच्या निशाण्यावर असल्याचा इशारा इराण यातून देत असल्याचा दावा केला जातो. यासाठी इराणची क्षेपणास्त्रे, ड्रोन्स तसेच विनाशिका देखील सज्ज असल्याचे संकेत इराणने या व्हिडिओतून दिल्याचे बोलले जाते. या युद्धसरावाच्या टायमिंगकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत. काही दिवसांपूर्वीच इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर हवाई हल्ले चढविण्यासाठी इस्रायलची लढाऊ विमाने सज्ज असल्याचा दावा केला होता. तसेच व्हिएन्ना येथील चर्चेचा निकाल काहीही लागला, तरी इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला चढविणार असल्याचे इस्रायलच्या नेत्यांनी जाहीर केले होते. यासाठी दिवस निश्‍चित केल्याची बातमीही समोर आली होती.

पण इस्रायलने इराणवर हल्ल्याची घाई करू नये, अशी सूचना बायडेन प्रशासनाने इस्रायलला केली आहे. इराणने देखील याची दखल घेऊन अमेरिकेच्या परवानगीशिवाय इस्रायल इराणवर हल्ला चढवू शकत नसल्याची टर उडविली होती. मात्र इस्रायलवर हल्ला चढविण्यासाठी इराणला कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे इराणच्या नेत्यांनी जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, इराणने हा व्हिडिओ प्रसिद्ध करून इस्रायलला नवी धमकी दिल्याचे दिसत आहे.

leave a reply