भारत-रशिया मध्य आशियाई देशांमध्ये संयुक्त लष्करी प्रकल्प उभारणार

नवी दिल्ली – भारत आणि रशिया संयुक्तपणे मध्य आशियाई देशांमध्ये शस्त्रास्त्रे आणि संरक्षणसाहित्याच्या निर्मितीचे प्रकल्प विकसित करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा पार पडल्याची माहिती काही परदेशी वृत्तसंस्थांनी दिली असून भारतीय माध्यमांमध्येही याच्या बातम्या आल्या आहेत. रशियन राष्ट्राध्यक्षांची भारतभेट व दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या पहिल्याच ‘टू प्लस टू’ चर्चेत हा मुद्दा होता. भारताचा प्रभाव यामुळे प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याची जाणीव झाल्याने चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मध्य आशियाई देशांना भेट देण्याचा निर्णय घेतल्याचे दावे केले जात आहेत.

भारत-रशिया मध्य आशियाई देशांमध्ये संयुक्त लष्करी प्रकल्प उभारणार६ डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या भेटीवर आले होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्र्यांमध्ये ‘टू प्लस टू’ चर्चा संपन्न झाली होती. या भेटीगाठींमध्ये रशियाने भारताला मध्य आशियाई देशांमध्ये शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या संयुक्त निर्मितीचा प्रस्ताव दिला. यात ताजिकिस्तान, कझाकस्तान, किरगिझिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनाही सहभागी करून घेतले जाईल. एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या या देशांमध्ये आजही रशियन कंपन्यांचे शस्त्रास्त्रे तसेच संरक्षणसाहित्याच्या निर्मितीचे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प अधिक विकसित करून भारत व रशिया तसेच मध्य आशियाई देशांबरोबरील लष्करी सहकार्य दृढ करण्याचा प्रस्ताव रशियाने भारताला दिला होता.

भारत व रशिया यांचा परस्परांवरील विश्‍वास असाधारण असून दोन्ही देश लष्करी सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहेत, असे रशियाचे संरक्षणमंत्री सजेर्ई शोईगू म्हणाले होते. त्यांचे हे उद्गार मध्य आशियाई देशांमधील भारत व रशियाच्या या सहकार्याचा दाखला देणारे असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भारतभेट व त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या टू प्लस टू चर्चेच्याही आधी भारताने मध्य आशियाई देशांशी अफगाणिस्तानविषयक चर्चा केली होती. यात रशियाने दिलेल्या प्रस्तावावरील चर्चेचाही समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे. यामुळे मध्य आशियाई देशांवर प्रभाव टाकण्यासाठी उत्सुक असलेल्या चीनची अस्वस्थता वाढली होती.

नैसर्गिक स्त्रोतांनी संपन्न असलेल्या मध्य आशियाई देशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र रशिया चीनच्या या हालचालींकडे सावधपणे पाहत असून चीनला काटशह देण्यासाठी रशिया भारताचे सहाय्य घेत आहे. याची जाणीव झाल्यानंतर बेचैन झालेल्या चीनने आपल्या परराष्ट्रमंत्र्यांचा मध्य आशियाई देशांचा दौरा आयोजित केला होता. पुढच्या महिन्यात हा दौरा संपन्न होणार असून चीन याहूनही अधिक आकर्षक प्रस्ताव मध्य आशियाई देशांना देईल, असे दावे केले जातात.

leave a reply