हौथींनी सौदीच्या विमानतळावर चढविलेल्या हल्ल्यात १६ परदेशी नागरिक जखमी

परदेशी नागरिक जखमीरियाध/अबु धाबी/बैरुत – सौदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला प्रवासी विमानतळावर हौथी बंडखोरांनी चढवलेल्या ड्रोन हल्ल्यात १६ परदेशी नागरिक जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून या हल्ल्यांवर ब्रिटन, इजिप्तसह इतर देशांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. यानंतर सौदीप्रणित अरब देशांच्या लष्करी आघाडीने हौथींच्या ठिकाणावर हल्ले चढवून याला उत्तर दिले. दरम्यान, या हल्ल्यानंतर युएईतील अणुप्रकल्पाच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे.

येमेनमधील हौथी बंडखोरांची आखातातील दहशत वाढत चालली आहे. सौदी अरेबियाच्या जिझान प्रांतातील किंग अब्दुल्ला प्रवासी विमानतळावर सोमवारी स्फोटकांनी सज्ज असलेल्या ड्रोनचे हल्ले झाले. येमेनची राजधानी सनामधून हे ड्रोन हल्ले चढविल्याची माहिती सौदीच्या यंत्रणांनी दिली. या हल्ल्यात विमानतळाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. गेल्या महिन्यातही हौथी बंडखोरांनी सौदीच्या विमानतळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवले होते. यापैकी एक क्षेपणास्त्र विमानावर कोसळल्याचे फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. पण सोमवारच्या हल्ल्यात परदेशी नागरिक जखमी झाल्याने याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले आहेत.

पुढच्या काही तासात सौदी अरेबियाप्रणित अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने येमेनमधील हौथी बंडखोरांच्या हजाह भागातील तळ उध्वस्त केले. यामध्ये हौथी बंडखोरांच्या ताब्यातील अकरा लष्करी वाहने नष्ट केल्याचा दावा अरब देशांच्या आघाडीने केला. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल, मुस्लिम वर्ल्ड लीग या संघटनांनी तर ब्रिटन, इजिप्त, कतार या देशांनीही सौदीवर झालेल्या हल्ल्याची कठोर शब्दात निर्भत्सना केली. त्याचबरोबर परदेशी नागरिकांची सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या हौथी बंडखोरांनी हल्ले थांबवावे असे आवाहन या देशांनी केले आहे.

याबरोबर हौथी बंडखोरांना आखाती क्षेत्रातून मिळत असलेल्या सहाय्यावर टीका होऊ लागली आहे. लेबनॉनमधील दोन वृत्तवाहिन्या हौथी बंडखोरांसाठी प्रचाराचे काम करीत असल्याचे उघड झाले आहे. सौदीमध्ये आश्रय घेतलेल्या येमेनच्या सरकारने ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्याबरोबर लेबनॉनच्या यंत्रणांनी या दोन्ही वृत्तवाहिन्यांवर कारवाई केल्याचा दावा केला जातो. इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेकडून हौथी बंडखोरांचे हे टीव्ही चॅनेल चालवले जात होते.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांमध्ये सौदी अरेबिया आणि युएईच्या राजधानीपर्यंत बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे धडकल्यामुळे हौथी बंडखोरांपासून अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युएईच्या बराकह अणुप्रकल्पाच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

युएईची राजधानी अबु धाबीमधल्या या अणुप्रकल्पामध्ये चार अणुभट्ट्या असून यातून युएईची पंचवीस टक्के इतक्या प्रमाणात ऊर्जेची गरज भागविली जाते. हौथी बंडखोरांच्या हल्ल्यापासून आपला हा अणुप्रकल्प सुरक्षित असल्याची ग्वाही युएईच्या संबंधित यंत्रणांनी दिली आहे.

leave a reply